मसूर : उत्तम वर्ण्य शिम्बीधान्य

Masur Dal

अनेक प्रकारच्या डाळी बाजारात उपलब्ध असतात. पूर्वापार या विविध डाळींचे उत्पादन आपल्या भारतात होत आहे. कडधान्य किंवा दाळ स्वरूपात आहारात उपयोग करण्यात येतो. आयुर्वेदात (Ayurveda) मूग हे नित्य सेवनीय म्हणजे रोज घेण्यास हितकर सांगितले आहे. पण शिम्बीधान्य वर्णन करताना मसुराचे गुणधर्म सांगितले आहेत.

मसूर कडधान्य स्वरूपात किंवा डाळीच्या स्वरूपात वापर करण्यात येतो. अख्खा मसूर, मसूर तांदळाची खिचडी किंवा पुलाव, सूप अशा विविध स्वरूपात मसूर आहारात सेवन केला जातो. मसूर (Lentil) भाजून शिजवून त्याचे पाणी काढून त्याला हिंग, तूप, जिरे, सुंठ घालून कढण पाचक आहार म्हणून घेता येतो. असे हे मसूर, आयुर्वेदात मसुराविषयी नेमके काय वर्णन आहे ते बघू या –

  • मसूर तुरट, मधुर रसाची थंड प्रकृतीची सांगितली आहे. पचायला हलकी आहे. परंतु मसूर रुक्षता आणणारी आहे.
  • मसूर उत्तम वर्ण्य म्हणजे त्वचा उजळ करणारी आहे. आपण त्वचेकरिता बेसनाचा उपयोग करतो; परंतु वर्ण्यलेप म्हणून वापरण्याकरिता मसूर सांगितला आहे.
  • मसूर ही रक्तविकार कमी करणारी आहे. रक्तातील उष्णता वाढून नसागत गुदगत रक्तस्राव होत असेल तर मसूर-तांदळाची पातळ खिचडी घेणे पथ्य सांगितले आहे.
  • रक्तार्श म्हणजेच मूळव्याधीच्या त्रासात रक्त पडत असेल तर मसूर शिजवून त्यात ताक घालून सुपाप्रमाणे घ्यावे.
  • रक्तस्रावी मूळव्याधीकरिता हे पथ्य आहार ( घेण्यायोग्य) सांगितला आहे.
  • याशिवाय रक्तार्शात मसुराचे कढण, डाळिंबाचा रस किंवा आमचूर किंवा लिंबूरस इ. आंबट चवीसह घ्यावे. पथ्य आहार म्हणून असे कढण रक्तस्राव होणाऱ्या मूळव्याधीत उपयोगी आहे.
  • पाण्डुरोग, रक्ताल्पता अशा विकारात पथ्य आहार म्हणून जेवणात मसुराचे सूपघ्यावे. मसूर पचायला हलकी, पित्त, रक्तविकार कमी करणारी असल्यानेपाण्डुरोगात उपयोगी आहे.
  • मसूर ही संग्राही म्हणजेच मल बांधून ठेवण्याचे काम करते. अतिसार, पित्त वाढून दुर्गंधी द्रव मलप्रवृत्ती होणे त्यामुळे गुदभागी दाह होणे अशाआजारांमध्ये आहारात असे पदार्थ हवे, जे पातळ मळाला घट्टपणा आणेल व वाढलेल्या पित्ताचे शमन करेल. मसूर त्या गुणाची असल्यामुळे पित्तजन्यअतिसारात त्याचे सूप घेणे लाभदायक आहे.

मसूर त्वच्य म्हणजेच त्वचेचा वर्ण चांगला करणारी आहे. रोज स्नानाच्या वेळी मसुराचे पीठ, दूध, मध, तूप असे मिश्रण करून किंवा केवळ मसूरपीठ दुधासह मिश्रण तयार करून त्याचा लेप चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्याचा काळेपणा किंवा चेहऱ्यावर वांग असेल तर कमी होते. मसूर रुक्ष असल्याने त्याचा वापर दूध वा थोडे तूप करून करावा. ज्यांची त्वचा खूप तैलीय असेल त्यांनी नुसत्या पाण्याने भिजवून लेप लावला तरी चालतो. हिवाळ्यात मात्र दूध, तूप यांचा मसूरपिठासह वापर करावा. इतर काही उत्पादन चेहराउजळ्याकरिता वापरण्यापेक्षा हा लेप स्वस्त व सहज उपलब्ध होणारा आहे.

मसूर हे पचायला हलके जरी असले तरी ते रुक्षता आणणारे, वात वाढविणारे आहे. त्यामुळे त्याला तेल किंवा तुपाचा संयोग करणे गरजेचे आहे जेणेकरुन स्निग्धता निर्माण होईल. मसूर कमीच उपयोगात येते. परंतु प्रत्येक डाळीचे कडधान्याचे काही विशेष गुण असतात ते जाणून घेणे महत्त्वाचे !

ayurveda

ही बातमी पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER