” तेणे माझ्या चित्ता समाधान ! “

satisfaction

“ठेविले अनंते तैसेची रहावे ,चित्ती असू द्यावे समाधान (satisfaction) ! ” हे पद समाधानाची महती सांगणारे आहे. हाव, हापापले पण सगळं काही टाकण्याची शिकवण हे पद देते .या पदाचा बरेचदा चुकीचा अर्थ घेतला जातो .”ठेविले अनंते…! म्हणजे काहीच न करता ,हात पाय न हलवता,” देरे हरी खाटल्यावरी” असे म्हणायचे, असा मुळीच नाही. फक्त जी परिस्थिती वाट्याला आली आहे आणि जिच्या बाबत मी काहीही करू शकत नाही ,त्याबाबत आहे ती परिस्थिती स्वीकारून, जे काय सकारात्मक आहे त्यातून आनंद घेत राहणे.

अशा खूप गोष्टी आयुष्यात येतात .ज्यामध्ये बदल करणं आपल्याला शक्य नसतं. लहान-मोठी आजारपणे ,अपघात ,साथीचे रोग किंवा दैनंदिन जीवनातल्या, दुसऱ्या बाबत आपल्या आप्त परिवारांनाबाबतचे काही निर्णय, समस्या सोडवण्यास बरेच वेळा मी काहीच मदत करू शकत नाही, अशी परिस्थिती असू शकते. अशावेळी केवळ चिंता करत राहणे किंवा दुःखी राहणे यापेक्षा चांगलं काय करता येईल ? याचा विचार करणे केव्हाही चांगले. उदाहरणार्थ चांगलंच इच्छित फळ प्राप्त झाल्याचं नजरेसमोर आणायचं किंवा सकारात्मक स्व सूचना द्यायच्या अशा आपल्या अधिकारा -तल्या गोष्टी आपण करू शकतो. या ओळींचे महत्त्व अशा परिस्थितीसाठी खूप लागू पडते. मग जे नाहीये , त्याच्यासाठी रडत बसण्यापेक्षा हा मार्ग केव्हाही चांगला. बरेच लोक त्याच त्या समस्यांमध्ये गुंतून राहणे पसंत करतात. म्हणजे ते कदाचित त्यातून बाहेर पडत नाहीत .चिंता, अपेक्षा ,दुःख या साम्राज्यात बुडून आपल्या हातातील आपलं चांगलं आयुष्य का गमवायचं ?याने आपल्याला निरर्थक त्रास होतो हेच खरं !

काल सहज समोरच्या मंदिराच्या कट्ट्यावर थोड्यावेळ बसले. राऊंड मारल्यानंतर बसायला आवडते मला तिथे ! दररोज काही ना काही गप्पा कानावर येतात. आयुष्यात कशी कशी दुःख असतात तेही कळतं.

काल एक काकू सांगत होत्या,” कोपर्‍यावर एक आजी राहतात, त्यांची दोन मुले गावातच आहेत आणि एक परगावी. तिघही सुस्थितीत आहेत. तशीच आजींची पण इस्टेट भरपूर आहे. ते आजोबा म्हणजे मागच्या महिन्यातच गेले. आजी काही करू शकत नाहीत. कामवाली आल्यानंतर त्यांना काय ते खायला देते. गावात मुले असून त्यांना काही नेत नाहीत बघा !”

“हो का ?” ” अहो ! पलीकडच्या गल्लीत एक जण आहेत. त्यांचे मिस्टर ही लवकर गेले. तरुण मुलगाही गेला. खरच खूप मोठे दुःख. त्या आता एवढ्या मोठ्या घरात एकट्याच राहतात. त्यांची पण इस्टेट भरपूर आहे”

“पण त्या बाई मात्र खूप छान राहतात .मस्त दररोज वेगवेगळ्या सुंदर साड्या घालून तयार होऊन बाहेर पडतात. दर महिन्याला आवडत्या साड्या घेतात. त्यांच्या त्यांच्या मैत्रिणी , ग्रुप्स सुरू असतात.”

त्यावर दुसर्या एक काकू बोलल्या,” त्या चक्कीसमोर बंगला आहे ना ,त्यात राहणाऱ्या..! त्याही अशाच! श्रीमंत आहे. त्यांना एवढा मोठा मुलगा आहे लग्न करायला, हो म्हणत नाही, आणि काही काम धंदा ही करत नाही, खरं तर एवढ्या तरुण मुलाला दररोज समोर बसलेले पाहून कसं वाटत असेल. पण त्या आपल्या आपण खूप छान राहतात, एन्जॉय करतात.” त्यावर एक प्रतिक्रिया अशी पण आली, “एवढे दुःख समोर, दररोज तो एवढ्या तरुण मुलगा समोर नुसता बसलेला बघून किती त्रास होत असेल ? कसं सुचतं काय की एवढा चांगलं राहायला ?”(सगळे tone असा की, सगळ्या कशा बिचाऱ्या काय करायची ती इस्टेट! त्यातही सुर असुयेचा)

माझ्या मनात आलं ,माणूस मृत्यूला भितो, कारण मृत्यू नंतर “उद्या” नसतो. प्रत्येक काम उद्यावर टाकायची सवय असते. वाचन ,व्यायाम, संगीत ऐकणे, एवढेच काय ,असून काय उपयोग एवढे पैसे ? “आज “उपभोगत नाही!

आणि म्हणून त्या दोन छान राहणाऱ्या काकू — वहिनी ज्या कोणी कळल्या होत्या, मला त्यांचा अभिमान वाटला. मुलगा नाही करत लग्न, नाही करत काम धाम ! देवाने लवकर प्रियजन हिरावून नेलेत. नाही नेत मुलं घरी त्यांच्या….! का म्हणून रडत बसायचं ? यापैकी कुठलीच गोष्ट एका मर्यादेपलीकडे त्यांच्या हातात नसेल. घेतात त्या सुंदर साड्या, राहता टापटीप. वावरतांना तो परिसर आपल्या अस्तित्वाने सुंदर करून सोडतात त्या. जे काही आहे ते त्यांनी मनापासून स्वीकारले आणि म्हणून आहे त्या आनंदी ! समाधानी !

स्मित हास्य ही अशी एक वक्ररेषा आहे आयुष्यातील अनेक गोष्टी सहज सरळ करू शकते. अनोळखी व्यक्तींकडे पाहून आपण सहसा हसत नाही पण समजा तसा प्रयत्न केला तर त्याच्या बदल्यात आपल्याला नक्कीच हास्य मिळतं. पाश्चात्त्य देशात अनोळखी व्यक्तीची नजरानजर झाली तर अनोळखी व्यक्तीला ‘हाय ! ‘ म्हणून शुभेच्छा दिल्या जातात. एखादी व्यक्ती रोज जरी भेटत असेल तरीही हे असेच चालते. आपले दुःख ,अडचणी ,एकटेपण दुसऱ्यांना सांगणे त्यांना आवडत नाही. त्यांच्या संस्कृतीत ते बसत नाही. अशा या दोघी जणी ! अनेक माणसे जोडली आहेत त्यांनी. आता दररोज देवळात येणाऱ्या “त्या दोघी” मलाही कधी मध्ये दृष्टीस पडतात. मनोभावे देवाला नमस्कार करताना दिसतात.

मी विचार करते काय म्हणत असतील या देवाला ? पावसचे संत स्वरूपानंद स्वामी यांनी त्यांच्या “संजीवन गाथा “या ग्रंथात ईश्वराच्या शरणागतीची सुंदर पदे लिहिली आहेत. त्यातील एक पद म्हणजे,”मागणे हे एक देई भक्ती प्रेम देवा तुझे नाम गाईन मी”आणि त्यातच ते शेवटी म्हणतात ,”स्वामी म्हणे पायी ठेवीन मी माथा, तेणे माझ्या चित्ता समाधान!” परमेश्वर चरणावर लीन होऊन त्या हे समाधानच तर मागतात. त्यांच्या सुंदर रहाण्याची उकल मला झाली.

 

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER