नागपुरातही विधिमंडळाचे कामकाज चालणार वर्षभर – नाना पटोले

Nana Patole

नागपूर : महाराष्ट्राची (Maharashtra) राजधानी मुंबईप्रमाणे (Mumbai) उपराजधानी नागपूर (Nagpur) येथे विधिमंडळ कार्यालयात वर्षभर कामकाज चालणार आहे. येत्या १५ दिवसात हे कार्यालय सुरू होईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की – विदर्भाचा महाराष्ट्रात समावेश केल्याने नागपूरचा राजधानीचा दर्जा गेला. पण, १९५३ ला झालेल्या नागपूर करारानुसार वर्षांतून काही विशिष्ट काळासाठी सरकार नागपूर येथे हलवण्यात येईल आणि राज्य कायदे मंडळाचे किमान एक तरी अधिवेशन दरवर्षी नागपुरात घेण्यात येईल. अशी तरतूद करण्यात आली. तेव्हापासून नागपुरात केवळ विधिमंडळाचे अधिवेशन असताना विधिमंडळ कार्यालय सुरू ठेवण्यात येत होते. इतर वेळी प्रत्येक कामासाठी मुंबईला हेलपाटे घालावे लागत होते. हे टाळण्यासाठी नागपुरातील विविधमंडळाचे कार्यालय वर्षभर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

उपसचिव दर्जाचा एक अधिकारी कायम येथे राहणार आहे. विदर्भातील आमदार आणि जनतेला तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील मुंबईला जावे लागणार नाही. येण्या-जाण्याचा त्रास वाचेल. विधिमंडळ कार्यालयाच्या परिसरात अद्ययावत ग्रंथालय आहे. विधिमंडळ कार्यालय वर्षभर सुरू ठेवले तर येथील ग्रंथालय या भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होईल. त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तसेच ज्ञानार्जनासाठी ते उपयोगी पडेल. वेळ आणि पैशांची बचत होईल. या भागातील नागरिकांची विधिमंडळ कार्यालय वर्षभर सुरू करण्याची जुनी मागणी आता पूर्ण झाली आहे. नागपुरात असेल तेव्हा मी याच कार्यालयात बसणार आहे, असेही पटोले म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER