इतिहासात पहिल्यादांच अध्यक्षांविना पावसाळी अधिवेशन

Vidhan Bhavan

मुंबई : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर यंदाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे घेण्यात येणार आहे. आजपासून अधिवेशनाला सुरुवात होत असून इतिहासात पहिल्यादांच अधिवेशन अध्यक्षांविना पार पडेल. आतापर्यंतची सर्व अधिवेशने विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्या उपस्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांमधील प्रश्नोत्तरांच्या जुगलबंदीमुळे गाजत असत. मात्र यावेळी कोरोनाची लागण झाल्याने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार नाहीत.

कोरोनाचे संकट लक्षात घेता यंदा अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक आमदाराला मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज असे साहित्य दिले जाणार आहे. अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी सर्वांनी हॅन्डग्लोज, मास्क लावून फिरले पाहिजे. फेस शील्ड देखील बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनामुळे एकत्र येण्याला बंधने आहेत. त्यामुळे सरकारच्या वतीने होणारा चहापानाचा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला आहे.

उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडेल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली.

कोरोना आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था लक्षात घेता हे अधिवेशन घेण्याचा अट्टाहास केला जातोय, असा आरोप विरोधक करत आहेत. तसेच कोव्हिडच्या संकटामध्ये अनेकांचा मृत्यू झाला, तरीही शासनाचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विरोधीपक्ष कोरोना, कायदा सुव्यवस्था, शेती, शिक्षण या विषयावर विरोधीपक्ष सरकारला जाब विचारणार असल्याचं सांगितलं जात आहे.

अधिवेशन कालावधी केवळ दोन दिवसांचा असल्याने या अधिवेशनात प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी नाहीत. यावेळी अधिवेशनात पहिल्या दिवशी दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि काही सदस्यांच्या निधनाचे शोक प्रस्ताव चर्चेला येणार आहेत. त्यानंतर सरकारच्या वतीने काही विधेयके मांडली जाणार आहेत. तसेच आर्थिक बिले पास करण्यासाठी अधिवेशन घेण्यात येत असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER