विधान परिषद निवडणूक आघाडी एकत्र लढणार का ? भाजपशी होणार टक्कर

विधान परिषद निवडणूक

राज्यातील पाच पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघातील विधान परिषदेची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केली. १ डिसेंबरला मतदान होईल आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात (Nagpur) सुरू होत असताना त्या आधी या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण तापणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार का हा औत्सुक्याचा विषय असेल.

यापुढील सर्व निवडणुका महाआघाडी (Mahavikas Aghadi) एकत्रितपणे लढवेल, अशी भूमिका शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादीने (NCP) वेळोवेळी मांडली आहे. या भूमिकेवर ठाम राहात हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार का हे यावेळी दिसेलच. तसे झाले तर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप (BJP) असा सामना रंगेल. बहुजन समाज पार्टी सर्व पाचही जागा लढण्याची शक्यता आहे. याशिवाय कोणत्याही पक्षाचे लेबल नसलेल्या पदवीधरांच्या व शिक्षकांच्या काही संघटनादेखील निवडणुकीत रंगत आणू शकतात.

राज्यातील पदवीधर आणि शिक्षकांचा पाच मतदारसंघात कोणाला कौल आहे हे या निमित्ताने कळेल. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड मानला जातो. आज केंद्रीय मंत्री असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे या मतदारसंघाचे पाच वेळा आमदार होते. त्यापूर्वी सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे वडील गंगाधरराव फडणवीस या मतदारसंघाचे आमदार होते. सध्या प्रा.अनिल सोले हे आमदार आहेत. भाजपचे दीर्घकाळ नगरसेवक राहिलेले सोले यांनी नागपूरचे महापौरपददेखील भूषविले आहे. भाजपच्या गडात भाजपला हरविण्यासाठी यापूर्वी अनेकदा ताकद पणाला लावली गेली; पण भाजपचा प्रचंड मतांनी विजय झाला होता.

अमरावती शिक्षक मतदारसंघात श्रीकांत देशपांडे हे शिक्षक आघाडीचे आमदार आहेत. गेल्या वेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेले अरुण शेळके यांचा पराभव केला होता. त्यावेळी देशपांडे यांना भाजप-शिवसेनेचा पाठिंबा होता. देशपांडे सध्या महाविकास आघाडीसोबत आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघात गेल्या वेळी भाजपचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे अटीतटीच्या निवडणुकीत जिंकले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे सारंग पाटील यांचा पराभव केला होता. सारंग हे साताऱ्यातील राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र आहेत. चंद्रकांत पाटील यांनी २०१९ मध्ये या मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा दिला आणि ते विधानसभेची निवडणूक जिंकले. तेव्हापासून ही जागा रिक्तच होती. आता भाजप नवीन उमेदवार देईल. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल.

पुणे शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार दत्तात्रेय सावंत हे महाराष्ट्र राज्य कृती समितीचे उमेदवार होते, त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेला होता. त्यांनी राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार भगवानराव साळुंके यांचा पराभव केला होता. साळुंके यांना भाजपचा पाठिंबा होता. भाजपने पदवीधरची जागा जिंकली; पण शिक्षक मतदारसंघात पराभव झाला होता. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण विद्यमान आमदार आहेत. त्यांनी भाजपचे शिरीष बोराळकर यांचा गेल्या वेळी पराभव केला होता. यावेळी राष्ट्रवादी-काँग्रेस व शिवसेना असे एकत्र आले तर भाजपसमोर ते तगडे आव्हान असेल.

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढणार का, याचे पहिले उत्तर या निवडणुकीच्या निमित्ताने मिळणार आहे.

————————————————-
निवडणूक कार्यक्रम असा
उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात- ५ नोव्हेंबर २०२०
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत- १२ नोव्हेंबर
उमेदवारी अर्जांची छाननी- १३ नोव्हेंबर
अर्ज माघार घेण्याची मुदत- १७ नोव्हेंबर
मतदानाची तारीख व वेळ- १ डिसेंबर, सकाळी ८ ते सायंकाळी ५
मतमोजणी व निकाल – ३ डिसेंबर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER