आता सहाव्या महिन्यापर्यंत कायदेशीर गर्भपात करता येईल

legal Abortion - Maharastra Today
  • सुधारित गर्भपात कायद्यास संसदेची मंजुरी

नवी दिल्ली :- आईच्या उदरात सहाव्या महिन्यापर्यंत वाढ झालेल्या गर्भाचाही काही अपवादात्मक परिस्थितीत गर्भपात करण्यास मुभा देणार्‍या सुधारित कायद्यास संसदेने मंजुरी दिली आहे. या सुधारित कायद्याने कायदेशीर गर्भपाताची सध्या असलेली २० आठवड्यांची (पाच महिने) कमाल मर्यादा आणखी चार आठवड्यांनी वाढवून २४ आठवडे (सहा महिने) करण्यात आली आहे.

यासाठी सन १९७१ च्या गर्भपात कायद्याच्या (Medical Termination of Pregnancy Act) कलम ३ मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. कायदा दुरुस्तीचे हे विधेयक राज्यसभेने मंगळवारी संमत केले. लोकसभेने ते गेल्या वर्षी मार्चमध्येच मंजूर केले आहे. राज्यसभेत काही सदस्यांनी हे विधेयक सविस्तर विचारविनिमयासाठी संयुक्त प्रवर समितीकडे पाठविण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु तो आवाजी मतदानाने अमान्य करून दुरुस्ती विधेयक मंजूर केले गेले. आता राष्ट्रपतींची संमती व नवी नियमावली तयार झाल्यानंतर सरकार हा सुधारित कायदा अधिसूचना काढून लागू करेल.

सध्या गर्भामध्ये व्यंग असणे किंवा बलात्कारामुळे गर्भधारणा झालेली असणे अशा प्रकरणांमध्ये २० आठवड्यांहून अधिक वाढ झालेल्या गर्भाचा गर्भपात करण्यासाठी उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात याचिका करावी लागत असे. आता २४ आठवड्यांपर्यंतच्या गर्भाचा गर्भपात करण्याचा निर्णय डॉक्टरही स्वत:च्या पातळीवर घेऊ शकतील.

कायदा दुरुस्ती विधेयकाची उद्देशपत्रिका म्हणते की, मूळ कायदा केल्यानंतरच्या काळात वैद्यकशास्त्रात झालेली प्रगती लक्षात घेता खासकरून अडचणीत असलेल्या महिलांच्या व तुलनेने उशिरा लक्षात येणाऱ्या व्यंगामुळे कराव्या लागणाऱ्या गर्भपाताची कमाल मर्यादा वाढविण्यास वाव निर्माण झाला आहे. शिवाय महिलांना सुरक्षित गर्भपाताचा मार्ग उपलब्ध करून अनुरक्षित गर्भपातांमुळे होणारे महिलांचे मृत्यू अथवा त्यांना सोसावा लागणारा त्रास कमी करण्यासाठीही ही मर्यादा वाढविणे गरजेचे झाले होते.

कोणत्या अपवादात्मक परिस्थितीत एक महिन्याच्या वाढीव कालमर्यादेत गर्भपात करता येईल याचे नियम स्वतंत्रपणे केले जातील. २० आठवड्यांपर्यंतचा गर्भपात एका डॉक्टरच्या सल्ल्याने करता येईल तर २० ते २४ आठवडे या दरम्यानच्या गर्भपातासाठी दोन डॉक्टरांचा सल्ला बंधनकारक असेल. गर्भ आणखी वाढू दिला तर त्याने त्या स्त्रीच्या शारीरिक अथवा मानसिक स्वास्थ्याला गंभीर धोका संभवू शकतो किंवा पोटात वाढत असलेल्या गर्भात असलेले व्यंग असे आहे की, असे मूल जन्माला आल्यास ते सर्वसामान्य आयुष्य जगू शकणार नाही, असे लेखी मत डॉक्टरांनी दिले तरच गर्भपात करता येईल.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER