राष्ट्रवादीचा पुढील वारसदार लोकशाही पद्धतीनेच ठरवणार, शरद पवारांचे स्पष्टीकरण

SHarad Pawar

अहमदनगर : जनतेने दिलेली संमती आणि संघटनेन दिलेल्या मान्यतेतून पुढील राजकीय वारसदार ठरत असतात. ही काय गादी नाही. माझे किंवा नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व वारसामुळे आलेले नाही. तसे असते तर आज भाजपचे नेते म्हणून लालकृष्ण अडवाणी आपल्याला दिसले असते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाही पद्धतीने पुढील राजकीय वारसदार ठरेल, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले. सोमवारी अहमदनगर येथे प्रचारासाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुरू असलेला अंतर्गत वाद राजकीय वारसदार न नेमण्याची प्रक्रिया कारणीभूत असू शकेल असे मानले जाते. या अनुषंगाने पवार यांना विचारले असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. राजकीय वारसदार ठरवताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पर्याय निवडले, तसा पर्याय देता येणार नाही काय, या आशयाच्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, बाळासाहेबांच्या मागे तरुणांची मोठी शक्ती उभी होती. बाळासाहेबांच्या नंतर पुढील नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी स्वीकारावे, अशी अपेक्षा त्यांच्या संघटनेची होती, ती पुढे आली. आता ते त्यांच्या मुलाला राजकारणात पुढे आणत आहेत. त्यांच्या संघटनेतून पाठिंबा मिळेल, तर तेही होईल. त्या संघटनेची तशी धाटणी आहे, त्यांची कार्यपद्धती तशी आहे. ती आमच्या पक्षात असणार नाही, असे ते म्हणाले.

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय ही बाब ‘टॅक्टिकल मूव्ह’ होती. सेना आणि भाजप कुठल्याही माध्यमातून एकत्र येऊ नयेत असेच आम्हाला वाटत होते. म्हणून आम्ही तशी खेळी केली. परिणामी भाजपला स्वतंत्रपणे सरकार स्थापन करावे लागले आणि शिवसेना नंतर सहा महिन्यांनी त्यात सहभागी झाली. मात्र, सत्तेतील त्यांचा हिस्सा कमी झाला होता. कदाचित त्यामुळेच शिवसेना नेतृत्वाला आमच्यावर राग असेल, असे पवार म्हणाले. अलीकडेच सिल्लोड येथील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी तेव्हा तुम्ही दर्शविली होती, असा उल्लेख करून पवारांवर टीका केली होती. ही पाश्र्वभूमी असणाऱ्या प्रश्नाच्या अनुषंगाने पवार बोलत होते.

दरम्यान, राष्ट्रवादीत होत असलेल्या गळतीबाबत बोलतांना पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमधून केवळ नऊ लोक बाहेर पडले आहेत. त्यामुळे फार काही मोठे संकट पक्षावर ओढवलेले आहे, असे नाही. अलीकडच्या काळात ज्या वेगाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुनर्बाधणी होत आहे, तो पक्षासाठी सर्वात वेगवान पुनर्बाधणीचा काळ समजायचा का, असे विचारले असता ते म्हणाले, यापूर्वीही प्रत्येक तालुक्यात दौरा केला आहे. सत्तेत नसताना सत्ताकाळात घेतलेले निर्णय कुठपर्यंत पोहोचले आणि त्यात काय कमतरता राहिल्या, हे विरोधी पक्षात येताना कळून येते. असेही ते म्हणाले.