भाजपला सोडून जयसिंगराव गायकवाड पाटील पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर?

Sharad Pawar & Jaysingh Rao Patil

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी डावलल्यामुळे नाराज झालेले ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड (Jaysingrao Gaikwad) यांनी मंगळवारी भाजपच्या (BJP) सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. यानंतर आता ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भारतीय जनसंघापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या जयसिंगरावांनी मधल्या काळातही भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि नंतर शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर ते पुन्हा घरवापसी करत भाजपमध्ये परतले होते. मात्र, त्यांनी आता पुन्हा एकदा भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

जयसिंगरावांनी आपल्या कारकिर्दीत, माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री, माजी सहकार राज्यमंत्री, दोन वेळा माजी मराठवाडा पदवीधर आमदार, तसेच तीन वेळा बीड जिल्ह्याचे खासदार, अशी अनेक पदे आजवर उपभोगली आहेत. ते भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीसही होते. गायकवाड यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती फेसबुकवरीही दिली आहे. त्यांनी आपल्या फेसबुकवरही राजीनाम्याची कॉपी शेअर केली आहे. यानंतर त्यांच्या या निर्णयावर विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही यायला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आता जयसिंगराव यांनी हा उमेदवारी अर्ज मागे घेणार असले तरी त्यांनी पक्षालाच रामराम ठोकला आहे. जयसिंगराव गायकवाड मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. यापूर्वी त्यांनी केंद्र आणि राज्यात काम केले आहे. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपला त्यांच्या जाण्याची किंमत मोजावी लागू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER