किमान लस तरी मोफत द्या ; राम कदमांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Ram Kadam & Uddhav Thackeray

मुंबई :- देशात सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर लवकरच देशभरात लसीकरणाचा कार्यक्रमही राबवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावरून भाजपा नेते आणि प्रवक्ते  राम कदम (Ram Kadam) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्रही लिहिले आहे.

राम कदमांचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र :

जगभरात पसरलेल्या कोरोना महासाथीच्या संकटाचा परिणाम भारतावरही झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि विशेषत: महाराष्ट्राला याचा  सर्वाधिक फटका बसला आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही राज्यात अधिक आहे. राज्यातील नागरिकांना आर्थिक समस्यांचाही सामना करावा लागत आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. केंद्र सरकारने आर्थिक मदत पुरवली असूनही राज्यातील गरजूंना मदत देण्यात आलेली नाही.

ही बातमी पण वाचा : कोरोना लसीकरणासाठी महापालिका पूर्ण क्षमतेने सज्ज ; मुंबईचा जम्बो प्लान

शेतकरी, कामगार वर्ग, छोटे दुकानदार, रिक्षा-टॅक्सीचालक यांना या काळात मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. राज्यातील खराब आरोग्य यंत्रणेमुळे अनेक गरिबांना प्राण गमवावे लागले. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील नागरिकांच्या समस्यांमध्येही अधिक वाढ झाली आहे. त्यांना अद्याप कोणतीही मदत देण्यात आलेली नाही, असेही त्यांनी यात नमूद केले आहे. भारतात कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून राज्यातील जनतेला ही लस मोफत दिली जावी अशी अपेक्षा आहे. राज्यातील जनतेला वेळेत ही लस मोफत मिळेल अशी मी आशा करतो. या आगोदर राज्य सरकार सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरलं आहे. म्हणून राज्य सरकारनं जनहितासाठी आणि निष्ठेनं जनतेची सेवा करावी. राज्य सरकारनं जनतेच्या हितासाठी चांगले निर्णय घ्यावे अशी माझी अपेक्षा आहे, असेही कदम यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER