जाणून घ्या रॉजर फेडरर व मिर्काची ‘लव्ह स्टोरी’!

Roger Federer and Mirka love story

रॉजर फेडररचे जगभरात लाखो समर्थक आहेत पण यात त्याची सर्वात खंदी समर्थक कुणी असेल तर ती त्याची पत्नी, मिर्का फेडरर. रॉजरच्या जवळपास प्रत्येक सामन्याठिकाणी ती त्याला प्रोत्साहन द्यायला उपस्थित असते.

मिर्का ही रॉजरच्या जीवनात आली ती टेनिसमुळेच कारण तीसुध्दा एक चांगली टेनिसपटू होती. मिरोस्लाव्हा वावरिनेक हे तिचे पूर्वीचे नाव. 2002 मध्ये हाॕपमन कप स्पर्धेत ती फेडररच्या जोडीने दुहेरीत खेळलीसुध्दा, आॕस्ट्रेलियाकडून ते पराभूत झाले आणि 2002 मध्येच तिने टेनिसमधून निवृत्ती पत्करली आणि 2009 मध्ये ती रॉजर फेडररशी विवाहबध्द झाली.

2002 मध्ये जेंव्हा रॉजर व मिर्का जोडीने खेळले तेंव्हा त्यांची एक मुलाखत झाली होती ज्यात त्यांनी अतिशय गमतीशीर उत्तरे दिली होती. 2001 च्या हॉपमन कप स्पर्धेचे स्वीत्झर्लंडने विजेतेपद पटकावले होते आणि त्यावेळी मार्टिना हिंगिस त्याची साथीदार होती. त्याबद्दल मिर्का म्हणाली होती की, मार्टिना ही एक उत्कृष्ट खेळाडू असून तिची जागा कुणीच घेऊ शकत नाही.

मिर्का स्वतः चांगली खेळाडू होती. जागतिक क्रमवारीत ती 76 व्या स्थानापर्यंत पोहचलेली होती. 2000 च्या सिडनी आॕलिम्पिकमध्ये ती राॕजर फेडररला पहिल्यांदा भेटली. हे आॕलिम्पिक संपता संपता त्यांचे प्रेमप्रकरण चांगलेच बहरले होते.

मिर्का चांगली खेळत असली तरी ती पायाच्या दुखापतीने त्रस्त होती आणि या दुखापतीपायीच तिने 2002 मध्ये निवृत्ती पत्करली. त्यानंतर ती रॉजरची जनसंपर्क व्यवस्थापक म्हणून काम करू लागली. पुढे 2009 मध्ये ते दोघे विवाहबध्द झाले आणि आता ते दोन वेळा जुळ्या मुलांचे मातापिता आहेत म्हणजे त्यांना एकूण चार अपत्ये आहेत.