जाणून घ्या सुएज कालव्याचा प्रचंड इतिहास आणि याचा जागतिक व्यापारावर परिणाम

Early Image Of Suez Canal

नवी दिल्ली : आशिया (Asia) आणि युरोपला (Europe) जोडणारा आणि भू-राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असणारा इजिप्तचा सुएज कालवा (Suez Canal) गेल्या चार दिवसांपासून ब्लॉक झाला आहे. सोसाट्याने सुटलेल्या समुद्री वाऱ्यामुळे माल वाहतूक करणाऱ्या एका महाकाय कार्गो शीपची दिशा बदलली आणि ते या चिंचोळ्या कालव्यात अडकलं. त्यामुळे या समुद्री मार्गे होणारी वाहतूक थांबली असून जगाच्या व्यापारावर मोठा परिणाम जाणवू लागला आहे.

जाणून घ्या सुएज कालव्याचा इतिहास

इजिप्तचा सुएज कालवा म्हणजे समद्रातील 193.3 किमीचा एक चिंचोळा मार्ग. या कालव्यावर सत्ता गाजवण्यासाठी अनेक युध्दं झाली आहेत. सध्या सुएज कालवा इजिप्तच्या ताब्यात आहे. सुएज कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्राशी तसेच अटलांटिक महासागराला पॅसिफिक महासागराशी जोडतो, म्हणजेच आशियाला युरोपशी जोडण्याचं काम करतो.

सुएझ कालवा हा इजिप्त देशातील एक कृत्रिम कालवा आहे. भूमध्य समुद्र व लाल समुद्रांना जोडणारा हा कालवा १९३.३ किलोमीटर (१२०.१ मैल) लांबीचा असून त्याचे बांधकाम इ.स. १८६९ साली पूर्ण करण्यात आले. सुएझ कालव्याचे उत्तरेकडील टोक बुर सैद शहराजवळ तर दक्षिण टोक सुएझच्या आखातावरील सुएझ शहराजवळ स्थित आहे. सुएझ कालव्यामुळे युरोप व आशिया या दोन खंडांदरम्यान जलद सागरी वाहतुक शक्य झाली आहे. सुएझ कालवा सुरु होण्यापुर्वी युरोपातुन आशियाकडे जाणाऱ्या बोटींना आफ्रिका खंडाला सुमारे ७००० किमी लांबीचा वळसा घालुन जावे लागत असे. ६ ऑगस्ट, २०१५ रोजी या कालव्याला समांतर असा ३४ किमी (२१ मैल) लांबीचा अजून एक कालवा सुरू करण्यात आला. यामुळे येथून दिवसाला ४९च्या ऐवजी ९७ जहाजे जाऊ शकतील. सुएझ कालवा प्राधिकरण या संस्थेकडे कालव्याची मालकी व देखभालीची जबाबदारी आहे. ही संस्था इजिप्त सरकारने १९५६ मध्ये स्थापन केली.

जहाज अडकल्याने जगाच्या व्यापारावर होणारे परिणाम…

मंगळवारी चीनमधून माल भरुन एक कार्गो शीप नेदरलॅन्डला रवाना होत असताना या कालव्यात फसलं. समुद्री वाऱ्याच्या जोराच्या झोक्याने या जहाजाला दुसऱ्या दिशेला फिरवलं त्यामुळे चालकाचं जहाजावरचं नियंत्रण सुटल्याने हे ४०० मीटर लांबीचं आणि ५९ मीटर रुंदीचं जहाज या कालव्यात फसलं. त्यामुळे हा समुद्री मार्ग ब्लॉक होऊन समुद्रात जहाजांचं ट्रॅफिक जाम झाल्याचं पहायला मिळतंय. हा मार्ग आता खुला होण्यासाठी काही दिवस लागतील असं सांगण्यात येतं.

बुधवारी इजिप्तच्या प्रशासनाकडून कालव्यात हे फसलेलं जहाज बाजूला करण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्यासाठी आठ टगबोट्सचा वापर करण्यात आला पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

याच समुद्री मार्गाने रोज जवळपास सरासरी ९० मोठी जहाजं आणि इतर अनेक लहान जहाजं प्रवास करतात. सुएज कालव्यात हे महाकाय जहाज अडकल्याने जगाची तासाला सुमारे २,८०० कोटी रुपयांची अर्थव्यवस्था थांबली आहे. या जहाजाचा मालक जपानी व्यक्ती आहे. त्याला वाटते की शनिवार संपेपर्यंत हा समुद्री मार्ग मोकळा होईल. पण तज्ज्ञांच्या मते, हा मार्ग मोकळा व्हायला अजून काही आठवड्यांचा काळ जाण्याची शक्यता आहे.

या चार दिवसात जवळपास ४०० जहाजांची वाहतूक बंद झाली आहे. हा कालवा ब्लॉक झाल्याने रोज जवळपास सरासरी ९.७ बिलियन डॉलर्सच्या मालाची वाहतूक थांबलीय. त्यामध्ये ५.१ बिलियन डॉलर्सची वाहतूक ही पश्चिमी देशांची आहे तर ४.६ बिलियन डॉलर्सची वाहतूक ही पूर्वेकडच्या देशांची आहे. हा समुद्री मार्ग जर मोठ्या काळासाठी बंद राहिला तर या जहाजांना आफ्रिका खंडाला वळसा घालून युरोप ते आशिया असा प्रवास करावा लागेल आणि ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER