आठव्या आॕलिम्पिकशिवाय आणखी कोणत्या विक्रमावर आहे लियांडर पेसचा डोळा

टेनिसमधील (Tennis) दिग्गज भारतीय खेळाडू लियांडर पेसने ( Leander Paes) विक्रमी आठव्यांदा आॕलिम्पिकमध्ये (Olympic) सहभागाची तयारी चालवली आहे. पुढच्या वर्षीचे टोकियो आॕलिम्पिक (Tokyo Olympic) हे लियांडरचे सलग आठवे आॕलिम्पिक असेल आणि एवढ्यांदा सलग आॕलिम्पिकमध्ये कुणीच सहभागी झालेले नाही.

2019 मध्येच लियांडरने 2020 हे आपले स्पर्धांचे शेवटचे वर्ष राहिल असे ‘वन लास्ट रोअर’ या घोषणेने जाहीर केले होते. त्यावेळी माहित नव्हते की 2020 मध्ये कोरोना एवढा मोठ्ठा खेळखंडोबा करेल, मात्र या प्रदीर्घ खंडानंतरही मी शारीरिक, मानसिक आणि भावनीकदृष्ट्या तयार आहे, असे लियांडरने एका कार्यक्रमात म्हटले आहे.

आपल्या देशाचे नाव इतिहासात कायम रहावे हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण 30 वर्षांच्याही पुढे कारकिर्द सुरुच ठेवली आहे. 23 जुलै 2021 रोजी टोकियो आॕलिम्पिक सुरु होईल त्यावेळी लियांडरचे वय 48 वर्षे असेल पण वय ही आपल्यासाठी फक्त एक संख्या आहे. आपल्या देशाचे नाव इतिहासात कायम राहिल हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, सलग सात आॕलिम्पिकमध्ये सहभागाचा विक्रम आधीच आपल्या नावावर आहे पण आठ वेळा सहभाग झाला तर आॕलिम्पिक टेनिसमध्ये सर्वाधिक वेळा सलग सहभाग हा विक्रम नेहमीसाठी भारताच्या नावावर लागेल, असे लियांडर म्हणतो.

त्यानेच 1996च्या अटलांटा आॕलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकून दिले होते. आता पुन्हा एकदा पदक जिंकण्यासाठी आपण खूप मेहनत घेत आहोत, निव्वळ सहभागासाठी आपण टोकियोला जाणार नाहीत तर जिंकण्यासाठी जाणार आहोत असा निर्धार लियांडरने व्यक्त केला आहे. टेनिसच्या चेंडूला खेळाडूचे वय कळत नाही. त्याला फक्त चेंडू किती ताकदीने मारला जातोय, त्याला किती फिरक दिली जातेय तेवढेच कळते आणि तेच महत्त्वाचे ठरते असे लियांडर म्हणतो.

रोहन बोपन्ना कि दिवीज शरण, कोणत्या साथीदारासोबत खेळायला आवडेल या प्रश्नाच्या उत्तरात तो म्हणाला की, आॕलिम्पिकचा जेंव्हा विषय येतो तेंव्हा साथीदार कुणीही असो, विश्वविक्रमी आठव्यांदा सहभाग हा विक्रम आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कुणासोबतही खेळायला मला आवडेल. रोहन, दिवीज आणि मिश्र दुहेरीत अंकिता रैना, कुणासोबतही खेळायला आपल्याला आवडेल, याच्याआधीसुध्दा मी महेशसोबत खेळलोय, सानियासोबत खेळलोय, पण प्रत्येकवेळी मी देशाला महत्व दिले आहे.

टोकियो आॕलिम्पिकशिवाय ग्रँड स्लॕम स्पर्धांतील सहभागाचे शतक पूर्ण करण्यासही लियांडर उत्सुक आहे. आतापर्यंत तो 97 ग्रँड स्लॕम स्पर्धात सहभागी झाला आहे.

त्याच्या नावावर 18 ग्रँड स्लॕम अजिंक्यपद असून डेव्हिस कप स्पर्धेतही दुहेरीत सर्वाधिक 45 विजयांचा विक्रम त्याच्या नावावर आहे. डेव्हिस कप, आॕलिम्पिक आणि ग्रँड स्लॕम, सर्वांचे विक्रम माझ्या नावावर लागल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. यामुळे नवीन वर्षांच्या स्पर्धांच्या कॕलेंडरकडे तो डोळे लावून बसला आहे. स्पर्धा ठरल्याप्रमाणे होतील की नाही हे अद्याप अनिश्चित असले तरी लवकरच कोरोनासाठी लसीकरण सुरु होवो जणेकरुन जनजीवन सामान्य होईल अशी आशा त्याने व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER