भाजपकडून आघाडीची कोंडी, तर युपीएच्या अध्यक्षपदावरून शिवसेना-काँग्रेस आमनेसामने

Sharad Pawar - Uddhav Thackeray - Sonia Gandhi

नवी दिल्ली : सध्या वाझे प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी विरोधीपक्ष असलेल्या भाजपने महाविकास आघाडी सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एक खळबळजनक विधान केले आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद शरद पवार(Sharad Pawar) यांना देण्याची आवश्यकता आहे, असं मत त्यांनी पत्रकार परिषद व्यक्त केलं होतं. राऊतांचं हे विधान काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांना पचनी पडलेले नाही. सोनिया गांधी या सध्या संयुक्त पुरोगामी आघाडी अध्यक्ष असून त्यांना बदलवण्याचा कुठलाही विचार नाही. त्यामुळे युपीएचे अध्यक्ष बदलण्याबाबत जे बोलत आहेत, त्यांनी प्रथम युपीएचा घटक पक्ष म्हणून सामील व्हावं, असा सल्ला काँग्रेस नेते राजीव सातव यांनी दिला आहे.

या मुद्द्यावरून आता काँग्रेस आणि शिवसेनेत चांगलाच वाद रंगला (Shiv Sena-Congress clash over UPA presidency)आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर परमबीर सिंह यांनी लेटर बॉम्ब टाकलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यानच्या काळात भारतीय जनता पक्षाला कमजोर करण्यासाठी तिसरी आघाडी बनवण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष विरहित इतर राजकीय पक्षांची एक तिसरी आघाडी बनवण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी म्हटले होते.

याच मताला धरून शिवसेना नेता संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या सारख्या राजकारणातील ज्येष्ठ नेत्याला संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष बनवण्याची गरज असल्याचे व्यक्त केले. काँग्रेसमधील अनेक नेते हे शरद पवार यांच्या नावाला पसंती देतात. आतापर्यंत सोनिया गांधी या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष होत्या. पण सध्या त्यांच्या प्रकृतीमुळे त्या युपीएसाठी फार वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी शरद पवार सर्वात योग्य आहेत, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

सध्या काँग्रेस पक्षातील काही नेत्यांचा जी२३ हा एक राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक गट तयार झाला आहे. यातील एका नेत्याने तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये सध्या नाराजी पसरली आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी ट्विट करत म्हटल की, ‘युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत आणि त्याच अध्यक्षा राहतील. आपल्या ट्विटमध्ये राजीव सातव पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या काही कळीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष राज्यात समजूतदारपणाने प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करत आहे. बाहेरच्या मंडळींनी युपीएमध्ये प्रवेश घेतला की त्यांच्या मतांची योग्य ती दखल घेऊ, असंही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : राऊतांनी कोणाचे प्रवक्ते जाहीर करावे : नाना पटोले; थोरात म्हणतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER