महाराष्ट्र वंचितचे लक्ष्मण माने शिवसेनेत जाण्यासाठी इच्छुक !

Laxman Mane

सोलापूर :- वंचित बहुजन आघाडीशी फारकत घेत स्वतःचा महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी पक्ष स्थापन करणारे लक्ष्मण माने शिवसेनेसोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत. प्रबोधनकार ठाकरे आमचे गुरु असल्याचे म्हणत शिवसेनेसोबत जाण्याची इच्छा त्यांनी सोलापूरात व्यक्त केली. वंचित बहुजन आघाडीचा भाजपला फायदा होत असल्याचा आरोप करत ते वंचित मधून बाहेर पडलेले होते, हे उल्लेखनीय.

ही बातमी पण वाचा : ओवेसी यांच्या सूचनेप्रमाणेच वंचितशी आघाडी तोडली- इम्तियाज जलील

मातोश्रीवर दिसायला आपणाला वावडं वाटणार नाही”, असे विधान महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी केले आहे. आमचा लढा हा भाजप विरोधात असून आम्ही एक वेळ शिवसेनेसोबत बोलणी करु. भाजप आणि शिवसेना वेगवेगळे पक्ष आहेत, असं म्हणत शिवसेनेसोबत जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी माने यांनी संघ आणि भाजपवर निशाणा साधला. “आमचा लढा हा भाजप विरोधात असून, आमचा अजेंडा भाजप भगाओ आहे. भाजपच्या मागे आरएसएस आहे. असा घणाघात लक्ष्मण माने यांनी केला.

दिवसेंदिवस देशाची आर्थिक स्थिती बिघडत चालली आहे. रुपयाचे मूल्य घसरत आहे. त्यामुळे देशातील उद्योगात कमालीची घट होत आहे. तरीदेखील देश सुव्यवस्थेत चालत आहे, अशा अविर्भावात भाजपा सरकारमधील नेते वावरत आहेत. वेळीच हे सरकार खाली खेचले नाही तर देशाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या विधानसभेत लोकांनी लोकशाही वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन देखील लक्ष्मण माने यांनी केले.

ही बातमी पण वाचा : आता काँग्रेससाठी वंचितचे दरवाजे बंद, वंचित स्वबळावरचं लढणार – प्रकाश आंबेडकर

आता लक्ष्मण माने शिवसेनेत जातात की त्याच्या स्वतःच्या पक्षातून ते निवडणूक वाढवितात हे येत्या काळात पुढे येणार आहे. मात्र भाजपवर टीका करणे त्यांना महागात पडू शकते. यामुळे शिवसेनाही त्यांना जवळ करणार नाही असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.