‘बंद’ पुकारायला वकील हे नेते, कामगार पुढारी नव्हेत; संपकरी वकिलांना मद्रास हायकोर्टाने फटकारले

Madras High Court - Lawyers

चेन्नई : ‘बंद’ पुकारायला वकील हे कोणी राजकीय नेते किंवा कामगार पुढारी नव्हेत, असे म्हणत मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) ऊठसूट कोणत्याही कारणावरून संप आणि बहिष्कार करणाऱ्या  वकिलांना आणि त्यांच्या संघटनांना फटकारले. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ तमिळनाडूच्या नागरकोविल जिल्ह्यातील वकील संघटनेने ‘बंद’ व न्यायालयांवर बहिष्कार घालण्याचे आंदोलन केले होते.

त्यात सहभागी न होता एक वकील त्याच्या कार्यालयात जाऊ लागला तेव्हा त्याला अडवून मारहाण करण्यात आली. या वकिलाला पोलीस संरक्षण देण्याचा आदेश देताना न्या. एन. किरुबाकरन व न्या. बी. पुगालेंधी यांच्या खंडपीठाने संपकरी वकिलांचा खरपूस समाचार घेतला. न्यायालयाने म्हटले की, वकिली हा एक उदात्त व्यवसाय आहे. वकील फक्त त्याच्या अशिलाचेच काम करत नसतो तर तो न्यायदान प्रक्रियेचाही अविभाज्य भाग असतो.

संप व बहिष्कार पुकारून वकील केवळ त्यांच्या अशिलाचीच प्रतारणा न करता न्यायदानाच्या कामातही मोडता घालतात. वैयक्तिक मते आणि राजकीय विचारसरणी काही असली तरी ते त्यांच्या व्यावसायिक कामात त्याचा शिरकाव होऊ देऊ शकत नाहीत. याआधी अनेक उच्च न्यायालयांनी व सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) वकिली व्यवसायात शिरलेल्या या अनिष्ट  मनोवृत्तीचा तीव्र शब्दांत धिक्कार केला आहे.

तरीही असे प्रकार सुरू राहावे हे या व्यवसायास लांछनास्पद आहे, असे ताशेरेही न्यायालयाने मारले. योग्य मार्गावरून भरकटणार्‍या आपल्यातील सदस्यांना आवर घालण्याऐवजी वकिलांच्या संघटनाही अशा प्रकारात सामील होतात हे दुर्दैव आहे, असेही न्यायालयाने म्हटले.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER