पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल वकिलास १० वर्षांची सक्तमजुरी

court order - Murder - Maharastra Today
  • दंडाच्या रकमेतून पत्नीला चार लाख भरपाई

ठाणे : भिवंडी शहराच्या बंदर मोहल्ला भागात राहणार्‍या अहमद आसिफ फकी या ५८ वर्षांच्या वकिलास पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल येथील सत्र न्यायालयाने १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सहावे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश  पी. पी. जाधव यांनी हा निकाल अलीकडेच जाहीर केला. आरोपी अहमद फकी यांना पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून तो वसूल झाल्यास त्यातील चार लाख रुपये त्यांची पत्नी रुमिन मुख्तार फरिद यांना भरपाई म्हणून द्यावेत, असाही आदेश दिला गेला.

हा खटला गेली १० वर्षे प्रलंबित होता व त्या काळात अहमद फकी जामिनावर होते. न्यायालयाने दोषी ठरविले त्या दिवशी ते हजर होते. परंतु शिक्षा ठोठावली त्या दिवशी ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे शिक्षा भोगण्यासाठी त्यांच्यावर अजामीनपात्र अटक वॉरन्ट जारी केले गेले.

अहमद फकी यांच्यासोबत सुमारे सात वर्षे संसार केल्यानंतर पत्नी रुमिन तीन मुलांना घेऊन माहेरी जाऊन राहू लागली. तिने फकी यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा खटला दाखल केला तर फकी यांनी रुमिन हिच्याविरुद्ध मुलांचा ताबा मिळविण्यासाठी दावा दाखल केला होता. मुलांच्या ताब्याचा वाद जमल्यास तडजोडीने मिटवावा, अशी न्यायालयाने सूचना केली. त्यादृष्टीने तडजोडीची बोलणी करण्यासाठी फकी, त्यांचे वकील यासीन अब्दुल जलील मोमिन, रुमिन व तिचे वकील प्रणव फडके ११ फेब्रुवारी, २०१० रोजी रात्री ८.३० च्या सुमारास मोमिन यांच्या  भिवंडीच्या भोईवाड्यातील मोहम्मद मंझिल इमारतीमधील ऑफिसमध्ये जमले होते.

ही बैठक सुरु होताच अचानक फकी यांनी पिशवीतून गावठी रिव्हॉल्वर काढून ते शेजारी बसलेल्या रुमिनच्या कपाळावर रोखले. परंतु त्याचा चाप ओढला गला नाही. लगेच फकी यांनी खंजीर काढून रुमिनवर वार करायला सुरुवात केली. तिने ते चुकविण्याचा प्रयत्न केला. तरी खंजीराच्या एका वाराने तिच्या कपाळावर १५ सेंमी लांब व तीन सेंमी रुंद जखम होऊन कवटीचे हाडही तुटले.दुसर्‍या वाराने  तिच्या उजव्या हाताचे मधले बोट व तर्जनी कापली गेली. फडके व मोमिन या दोन्ही वकिलांनी फकी यांना धरले व ऑफिसच्या बाहेर ढकलले. बाहेर रुमिन हिची मोटार उभी होती. ती घेऊन फकी फरार झाले. नंतर सुमारे एक महिन्याने त्यांना बारामतीमध्ये अटक करण्यात आली.

स्वत: रुमिन, मोमिन आणि फडके हे दोन वकील व डॉक्टरांनी दिलेल्या साक्षींवरून फकी यांच्याविरुद्धचा खुनाचा प्रयत्न करण्याचा (भादंवि कलम ३०९) सिद्ध झाला. मोमिन यांच्या ऑफिसमधील तडजोडीच्या बैठकीला आपण गेलोच नव्हतो. त्यावेळी आपण दुसर्‍या दिवशी होणार्‍या एका क्रिकेट स्पर्धेच्या तयारीसाठी एखा शाळेच्या मैदानावर होतो. तसेच रुमिनला झालेल्या जखमा आपण हल्ला केल्याने नव्हे तर गटाराच्या उघड्या मॅनहोलमध्ये पडून झाल्या, असा बचाव फकी यांनी केला. त्यासाठी त्यांनी स्वत: साक्ष दिली व आणखी दोन साक्षीदारही उभे केले. विषेष म्हणजे फकी यांनी खटल्यात किंवा तपासातही आधी कधीही ही सबब सांगितली नव्हती. त्यामुळे न्यायालयाने ती विश्सासार्ह मानली नाही.

पोलिसांनी फकी यांच्याकडील गावठी रिव्हॉल्वर जप्त केले नाही. त्यामुळे ते रुमिनच्या कपाळावर रोखून चाप ओढण्याचा शस्त्र कायद्याकालील गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. तसेच रुमिनवर हल्ला करत असतानाच ‘इसके बाद आपको भी खत्म करुंगा’ असे म्हणत वकील फडके यांनाही ठार मारण्याची धमकी देणे व रुमिनची मोटार घेऊन पळून जाणे या गुन्ह्यातूनही न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले. स्वत:वकील असूनही खटला लवकर संपविण्यासाठी सहकार्य करण्याऐवजी नानाविध क्लृप्त्या करून तो १० वर्षे लांबविल्याबद्दल न्यायालयाने फकी यांच्यावर तोशेरे ओढले.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button