वकील महिलेकडून न्यायालयातच आत्महत्येचा प्रयत्न

suicide

पुणे (प्रतिनिधी) : काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या महिला वकिलाने शुक्रवारी (दि. 3) पुण्यातल्या न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ माजली. घटनेनंतर संबंधित महिलेला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित महिलेवर टिळक यांचे वकील नंदू फडके यांच्या अपहरणाचा तसेच फडके यांचा मुलगा संदीप याच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणीही संबंधित महिलेवर डेक्कन पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्या जिल्हा न्यायालयातील जुन्या इमारतीत हजर होत्या. सुनावणी झाल्यानंतर दुपारी सव्वाचारच्या दरम्यान त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. तर संबंधित महिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर आहे. तपासात सहकार्य करण्यास तयार असून पोलिसांनी चौकशी करावी, असा अर्ज त्यांनी डेक्कन पोलिसांना दिला आहे. मात्र त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. त्यांना गुंतवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांमुळे त्या तणावाखाली असल्याचा दावा महिलेच्या वकीलांनी केला. न्यायालयात त्या कोसळल्यानंतर बाजुला असलेल्या वकिलांनी त्वरित पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलून महिलेला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठवले.

ही बातमी पण वाचा : कल्याणमधील नगरसेवकाकडून खंडणी उकळणाऱ्या तरुणीला अटक