महाराष्ट्राने केलेले कायदे चालतात, देशाचे का नाही? – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई : काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस (Congress-NCP) केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांचा विरोध करत आहेत. यावर दोन्ही पक्षांवर टीका करताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना प्रश्न विचारला – काँग्रेसने बाजारसमिती रद्द करण्याचे आश्वासन का दिले? २००६ मध्ये कंत्राटी शेतीचा कायदा महाराष्ट्राने केला. महाराष्ट्राने केलेले कायदे चालतात? मग देशाचे कायदे का नाही? हा ढोंगीपणा का?

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुमारे दोन महिन्यांपासून शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकरी एकवटले आहेत. आज (सोमवारी) मुंबईतील आझाद मैदानात शेतकरी आंदोलनासाठी एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) या मोर्चात सहभागी झाले आहेत, हे उल्लेखनीय.

फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रात कृषी विधेयक येऊन एवढे दिवस झाले, महाराष्ट्रात कुठलेही आंदोलन झाले नाही. आता काही पक्ष ढोंग करत आहेत. शेतकऱ्यांची दिशाभूल प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना चुकीची माहिती देत आहेत. आता जे या मोर्चाच्या निमित्त मंचावर जात आहेत किंवा या मोर्चाला मदत करत आहेत. त्यांना माझा प्रश्न आहे, काँग्रेसने आपल्या २०१९ च्या जाहीरनाम्यामध्ये बाजार समिती रद्द करा आणि आम्ही निवडून आलो तर आम्ही बाजार समिती रद्द करून टाकू, असे का म्हटले होते?”

“२००६ मध्ये कंत्राटी शेतीचा कायदा त्यांनी का मंजूर केला. २००६ पासून २०२० पर्यंत तो महाराष्ट्रात लागू आहे. महाराष्ट्रतला कायदा चालतो तर देशातील कायदा का चालत नाही? ही ढोंगबाजी का? याचे उत्तर काँग्रेस-राष्ट्रवादीने दिले पाहिजे.” असे फडणवीस म्हणालेत.

“महाराष्ट्रात २९ थेट खरेदीची परवाने काँग्रेस -राष्ट्रवादीच्या काळात सर्वात अगोदर देण्यात आले. आता ढोंगबाजी सुरू आहे. हा वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रयत्न आहे. याला शेतकऱ्यांचा पाठिंबा नाही. उलट शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने या तिन्ही कायद्याचे स्वागत केले आहे व हे शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आहेत, असे म्हटले आहे,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER