‘लावा इंटरनॅशनल’ भारतात येणार; चीनमधील उद्योग गुंडाळला

Lava International

नवी दिल्ली : मोबाईल साहित्य बनविणारी कंपनी लावा इंटरनॅशनलने शुक्रवारी घोषित केले की, चीनमधील प्रकल्प कायमचा बंद करून आम्ही भारतात जात आहोत. लावा भारतात आठ अब्ज रुपये गुंतवणार आहे.

चीनमधून जगात पसरलेल्या कोरोनाच्या साथीनंतर, चीनच्या संशयास्पद वागणुकीमुळे जगाचे अर्थकारण आणि राजकारण बदलले आहे. अनेक उद्योग चीनमधून बाहेर पडत आहेत.

लावाने मोबाईल फोन विकसित आणि निर्माण करण्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी योजना आखली आहे. लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष हरिओम राय यांनी सांगितले की, उत्पादन डिझाईन करण्याच्या क्षेत्रात आमचे चीनमध्ये सुमारे ६०० ते ६५० कर्मचारी आहेत. हे काम आम्ही भारतात हलविले आहे. भारतातील विक्रीच्या गरजा आम्ही स्थानिक प्रकल्पांतून पूर्ण करत आहोत.

ते पुढे म्हणाले की, आम्ही चीनच्या प्रकल्पातून काही मोबाईल फोनची निर्यात जगभरात करतो. आता हे काम भारतातून होणार आहे. भारतातील लॉकडाऊन काळात आम्ही जगातील स्मार्टफोन आणि उत्पादनांची मागणी चीनमधून पूर्ण केली आहे. आता माझे स्वप्न आहे की, चीनला मोबाईलची उपकरणे निर्यात करण्यास भाग पाडावे. भारतीय कंपन्या मोबाईल चार्जर आधीपासूनच चीनला निर्यात करत आहेत. केंद्र सरकारने देऊ केलेली प्रोत्साहन योजना यामध्ये मोठी क्रांती घडवेल. यामुळे चीनमधील पूर्ण प्रकल्प आम्ही भारतात आणत आहोत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला