सचिनच्या विश्वविजयी छायाचित्राला सर्वात संस्मरणीय क्रीडा क्षण पुरस्कार

Laureus sports award - Sachin Tendulkar
  • लॉरियस वार्षिक क्रीडा पुरस्कारात सन्मान
  • गेल्या 20 वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रीडा क्षण म्हणून निवड
  • लियोनेल मेस्सी व लुईस हॅमिल्टन आणि सिमोन बाईल्स ठरले सर्वोत्कृष्ट खेळाडू
  • दक्षिण आफ्रिकेचा रग्बी संघ वर्षात सर्वोत्कृष्ट

बर्लिन :- क्रीडा जगतातील ऑस्कर पूरस्कार मानल्या जाणाऱ्या लॉरियस क्रीडा पुरस्कार 2020 मध्ये कार रेसिंगपटू लुईस हॅमिल्टन व फूटबॉलपटू लियोनेल मेस्सी हे वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू तर अमेरिकेची जिम्नॅस्ट सिमोन बाईल्स ही सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ठरली. आपल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या 2011 मधील विश्वविजयानंतरच्या मैदानातील मिरवणूकीच्या छायाचित्राला ‘बेस्ट स्पोर्टिंग मोमेंट’ पुरस्कार मिळाला आहे. एका शानदार सोहळ्यात सोमवारी या पुरस्कारांनी जगभरातील नामांकित खेळाडूंना सन्मानीत करण्यात आले.

या पुरस्कारांचे हे विसावे वर्ष होते. या 20 वर्षात प्रथमच लियोनेल मेस्सीच्या रुपाने सांघिक खेळातील खेळाडूला वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे.

लॉरियस 2020 पुरस्कारांचे विजेते असे..

1) जगातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू – लुईस हॅमिल्टन व लियोनेल मेस्सी
2) जगातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू- सिमोन बाईल्स
3) वर्षातील सर्वोत्कृष्ट संघ- दक्षिण आफ्रिका पुरुष रग्बी संघ (विश्वविजेते)
4) वर्षातील नव्याने चमकलेला खेळाडू- इगन बेर्नाल
5) वर्षातील सर्वोत्कृष्ट पुनरागमन- सोफिया फ्लोर्श्च
6) वर्षातील सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू- ओक्साना मास्टर्स
7) वर्षातील सर्वोत्कृष्ट ‘ऑक्शन’ क्रीडापटू- क्लो कीम
8) सर्वोत्कृष्ट क्रीडा क्षण- सचिन तेंडुलकर (करीद ऑन दी शोल्डर्स ऑफ अ नेशन)
9) जीवन गौरव पुरस्कार- डर्क नोवित्झकी (बास्केटबॉल – जर्मनी)
10) विशेष कामगिरी पुरस्कार – स्पॅनिश बास्केटबॉल महासंघ
11) खेळ सदभावना पुरस्कार- साऊथ ब्राँक्स युनायटेड

जाणून घ्या विजेते-

डर्क नोवित्झकी

बास्केटबॉलमधील महान जर्मन खेळाडू डर्क नोवित्झकी यांना त्यांच्या योगदानासाठी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 21 वर्षांची यशस्वी कारकिर्द राहिलेले नोवित्झकी हे युरोपातील सर्वोत्तम बास्केटबॉलपटूंपैकी एक मानले जातात. त्यांनी डल्लास माव्हेरिक्स संघासाठी अनेक वर्ष योगदान दिले. 2018-19 मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली तोवर ते किमान 31 हजार गूण, 10 हजार रिबाऊंड, 3 हजार असिस्ट, एकहजार थ्री पॉईंटर करणारे एकमेव खेळाडू ठरलेले होते.

दक्षिण आफ्रिकन रग्बी संघ

रग्बीचा विश्वचषक जिंकणारा दक्षिण आफ्रिकन संघ वर्षातील सर्वोत्कृष्ट संघ ठरला. त्यांचा सफल कर्णधार सिया कोलीसी याने हा पुरस्कार स्विकारला. गरीब मुलांसाठी फूटबॉलच्या माध्यमातून काम करणाऱ्या न्यूयॉर्क स्थित साऊथ ब्राँक्स युनायटेड उपक्रमाला सदभावना पुरस्कार देण्यात आला.

सोफिया फ्लोर्श्च

वर्षातील सर्वोत्कृष्ट पुनरागमन पुरस्काराची मानकरी ठरलेली सोफिया फ्लोर्श्च ही मोटाररेसिंगपटू 2018 मधील मकाऊ ग्रँड प्रिक्समध्ये झालेल्या एका अपघातात जबर जखमी झाली होती. तिच्या मणक्यात फ्रॅक्चर झाले होते आणि तिला 11 तासांच्या अवघड शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले होते. त्यातून सावरुन तिने मर्सिडीज संघासाठी एफ-3 रेसिंगमध्ये वर्षभरातच पुनरागमन केले.

सचिन तेंडूलकर

गेल्या 20 वर्षांतील खेळांच्या मैदानावरचा अविस्मरणीय क्षण म्हणून सचिन तेंडूलकरच्या 2011 मधील विश्वविजयानंतरच्या विजयी मिरवणुकीच्या छायाचित्राची निवड झाली. त्यावेळी भारताने मायदेशी प्रथमच विश्वचषक जिंकला होता आणि विश्वविजयात मोलाचे योगदान देणाऱ्या सचिन तेंडूलकरला सहकाऱ्यांनी खांद्यावर उचलुन घेत त्याला डौलाने फडकत्या तिरंग्यासह मैदानाची विजयी फेरी मारली होती. या छायाचित्राला लॉरियस अकादमीने करिंड ऑन दी शोल्डर्स ऑफ नेशन असा संयुक्तिक मथळा दिला होता.

हा पुरस्कार स्विकारायला सचिन बर्लिनमध्ये हजर होता. त्याला सफल टेनिसपटू बोरीस बेकर व समकालीन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टिव्ह वॉ यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

इगन बेर्नाल

ब्रेक थ्रु पुरस्कार मिळालेला इगन बेर्नाल हा सायकलपटू असुन तो टूर दी फ्रान्स या खडतर सायकल शर्यतीचा सर्वात कमी वयाचा विजेता आहे. एवढेच नाही तर या 22 वर्षीय खेळाडूच्या रुपाने कोलंबियाच्या खेळाडूने प्रथमच ही शर्यत जिंकली आहे.

ओक्साना मास्टर्स

सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू ठरलेली स्किइंगपटू ओक्साना मास्टर्स ही चेर्नोबील दूर्घटनेच्या किरणोत्सर्गाची पीडित आहे. या दूर्घटनेपायी तिला पाय गमवावे लागले पण तरीसुध्दा तिने जागतिक पॅरा नोर्डिक स्किईंग स्पर्धेत पाच सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकण्याची थक्क व्हायला लावणारी कामगिरी केली. याशिवाय स्किईंग क्रॉस कंट्रित ती विश्वविजेतीही ठरली. आपल्या आईसोबत तिने हा पुरस्कार स्विकारला.

सिमोन बाईल्स

अमेरिकेची सिमोन बाईल्स ही जिम्नॅस्टक्समधील 25 विश्वविजेतेपदांसह सर्वात सफल खेळाडू आहे.तिने गेल्यावर्षी विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पाच सुवर्णपदक जिंकली. तिला तिसऱ्यांदा लॉरियस पुरस्काराचा सन्मान मिळाला.

क्लो कीम

स्नोबोर्डींग स्टार क्लो कीम ही सलग दुसऱ्या वर्षी ऑक्शन पुरस्काराची विजेती ठरली. अवघ्या 19 वर्षाच्या क्लोने एक्स गेम्सची पाच सुवर्णपदकं, एक ऑलिम्पिक सुवार्णपदक आणि विश्व अजिंक्यपदसुध्दा कमावलेले आहे.
This iconic moment was the image of the tournament for India after winning the 2011 Cricket World Cup.

स्पॅनिश बास्केटबॉल महासंघ

लॅरियस पुरस्कारांच्या इतिहासात केवळ चौथ्यांदा देण्यात आलेला विशेष कामगिरीचा पुरस्कार स्पॅनिश बास्केटबॉल महासंघाला त्यांच्या पुरुष विश्वविजेतेपदासाठी आणि महिला संघाच्या गेल्या सलग चार युरोपियन विजेतेपदासाठी देण्यात आला.

लियोनेल मेस्सी

या पुरस्कारांच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार दोन खेळाडूंना संयुक्तरित्या देण्याची वेळ आली. बलोन डीओर विजेता अर्जेंटिनाचा फूटबॉल स्टार लियोनेल मेस्सी हा सांघिक खेळातील पहिलाच लॅरियस पुरस्कार विजेता ठरला.

लुईस हॅमिल्टन

ब्रिटनचा 35 वर्षीय लुईस हॅमिल्टन हा फॉर्मुला वन रेसिंगचा सहा वेळचा विश्वविजेता आहे. गेल्या वर्षी त्याने 11 स्पर्धा जिंकताना वर्षातील दोन शर्यती शिल्लक असतानाच आपले विश्वविजेतेपद निश्चित केले होते.

कोबे ब्रायन्टचे स्मरण

समारंभाच्या सुरुवातीला अलीकडेच विमान अपघातात ठार झालेला लोकप्रिय बास्केटबॉलपटू कोबे ब्रायन्ट व त्याची कन्या जियान्ना यांचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करणाऱ्या हॉलीवूड स्टार ह्युज ग्रांट यांनी कोबे व जियान्नाच्या सन्मानात मौन पाळण्यापेक्षा त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी टाळ्यांचा कडाकडाट करण्याचे आवाहन केले आणि उपस्थितांनी त्याला प्रतिसाद दिला.