पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे

look at yourself in the mirror illustration

यौवनावस्था आली की कोणत्याही व्यक्तीला मी कसा दिसतो किंवा मी कशी दिसते, त्याचे खूप महत्त्व वाटायला लागते. त्यातूनच पुढे त्या व्यक्तीचा “स्व “सेल्फ विकसित होत असतो, आत्मविश्वास वाढत असतो. पूर्वीपासूनच ही ओढ कायम असल्याने, “सांग दर्पणा कशी मी दिसते?” म्हणत येता-जाता आरशात डोकावणं असो, की पाण्यातलं प्रतिबिंब असो आपण त्याच्या प्रेमात पडतो. आणि पुढे कुणाला तरी आवडावं म्हणून काहीतरी करून परत परत आरश्यात पाहणे ही खरं तर नैसर्गिक वृत्ती आहे. पण तरीही मागच्या पिढीपर्यंत, “काय आहे सतत आरशात बघणं. पुरे आता ! “म्हणून दटावलं जायचं.

सेल्फी हा पण त्याचाच अद्ययावत प्रकार. पण म्हणतात ना अतिरेक कशाचाही वाईटच ! फोनच्या स्मार्ट पणात भर घालत नवीन डिझाइन्स तयार होतात. सेल्फी या फिचर वर मार्केटिंग करणाऱ्या नामांकित कंपन्यांचे शेअर्स एका वर्षाच्या काळात २%यावरून १७%टक्क्यांवर जातो. आणि मग फोन येणं वा जाणं हे कार्य विसरून सारेच ब्रँड कॅमेर्‍याच्या शर्यतीत उतरतात. मात्र यापैकी कोणालाही त्यांच्या युजर गाईड मध्ये याच्या अविवेकी वापराने होणारे दुष्परिणाम मात्र जगाला सांगता येत नाही. एवढं सामाजिक भान कोणी ठेवावं ?

आज अगदी छोट्याशा बाळालाही सेल्फी काढलेला समजतो. कुठून येत याला हे ज्ञान ?तर एकूणच वातावरणातून आणि पालकांकडून. आणि मग जास्तीत जास्त बेहतरीन कॅमेरा असणारे फोन घेण्यातच नवीन पिढी मशगुल होत जाते. आणि मग मागे जश्या एका मागून एक बातम्या आपल्याला बघायला मिळाल्या. २०१४ मध्ये अमृत पाल या अमेरिकन पायलटला एका प्रवाशांसह सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही आणि म्हणूनच कोणताही तांत्रिक दोष नसताना देखील विमान कोसळून दोघे जण ठार झाले. तशीच घटना घडली ऑगस्टच्या 2014मध्ये केरळमधल्या शरणपूर स्टेशन वर 14 वर्षाच्या एका मुलाचा मृत्यू झाला. धावत्या रेल्वे समोर रेल्वेच्या टपावर चढून सेल्फी घेण्याचा प्रयत्न शरणपूर मिरा रोड जोगेश्वरी या ठिकाणी कोवळ्या मुलांच्या आयुष्याचा अंत करण्यास कारणीभूत झाला. मार्च 2015 मध्ये तरुण मंडळी नागपूर जवळील तलावांमध्ये गेली होती आनंदाने जल्लोष सुरू होता अचानक बोट उलटली आणि ७ जणांचा मृत्यू झाला. ट्रीप ला गेलेल्या या दहा मुलांनी सेल्फीच्या नादात बोटीचा समतोल बिघडवला होता. हे तर काही प्रातिनिधिक प्रसंग. असे अनेक मृत्यू घडत राहतात.

पण सेल्फीचे हे वेड आपल्याला जिकडेतिकडे दिसते. आणि अक्षरशः अंगावर काटा येईल अशा ठिकाणी उभा राहुन तरुण जनरेशन सेल्फी काढताना दिसते. यात कमी म्हणूनच की काय परवा एका लग्न प्रसंगात गेले होते. त्यावेळी एका स्मार्ट आजीकडे सेल्फी स्टिक होती. आणि त्या सगळ्या एका वयाच्या हसत-खिदळत सेल्फी काढत होत्या. कधीतरी ही गोष्ट आनंददायी आहे आणि करायलाही हरकत नाही. त्यांनी आपलं “मूल पण “जपलेलं होतं असं म्हणता येईल. पण याने जेव्हा जीवाला धोका होतो, तेव्हा त्याला मृत्यू म्हणावं की आत्महत्या, हाच प्रश्न निर्माण होतो. तर असा हा “बेभान आत्ममग्नता” नावाची मानसिक व्याधी नव्याने निर्माण करणारा, एक छुपा शत्रू म्हणूनही याचे वर्णन करता येईल.

याची आकडेवारी आपण बघितली तर भारतामध्ये 2017 यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यात 14 तरुण-तरुणींनी सेल्फी मुळे आपले प्राण गमावले. हे 18 ते 24 वयोगटातील असेच होते .यात मुलींच्या तुलनेत मुलांचे मृत्यू अधिक झाले आहेत. अतिसाहसी प्रवृत्ती कदाचित असल्यामुळे असे असू शकेल. जगाच्या संदर्भात आकडेवारीचा विचार करायचा तर 2015 मध्ये दर दिवसाला 93 मिल्लियन सेल्फी काढल्या जात असल्याची नोंद सापडते. 2011 ते 2017 यादरम्यान सेल्फी काढताना जगभरामध्ये 259 लोकांचा मृत्यू झाला त्यापैकी 50 टक्के लोक भारतातले आहेत.

तर असं हे जीवघेणं प्रकरण. जीव गमावणारे थोडेच असले तरीही करोडो लोक आज या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत. आपल्या प्रत्येक पोजची, कृतींची, प्रवासाची सेल्फी काढायची आणि पोस्ट करायची आणि लाईक्स मिळवायच्या हेच आयुष्य होऊन बसत. यालाच मानसशास्त्रीय भाषेमध्ये “सेल्फी सिंड्रोम”, “सेल्फी अडिक्शन” म्हणतो. सेल्फी की एक नवी आणि प्रत्येकाला सुखद हवीहवीशी वाटणारी गोष्ट. स्वतःला स्वतः पाहणे याचा आनंद काही वेगळाच. स्वतःला न्याहाळतांना जणू त्यांना आत्मसाक्षात्कार होत असतो इतका की देहभान देखील गळून जातं. इतक्या या नवीन पिढीला आत्ममग्नता येण्यामागचं कारण काय ?

ते बघण्या आधी आपण या सिन्ड्रोम च्या तीन पातळ्या विचारात घेऊ. दिवसातून तीन ते सहा सेल्फी काढणे. किमान दोन तीन पोस्ट करणे. असे करत असाल तर बॉर्डर लाईन सिंड्रोम. दहाच्या आसपास सेल्फी काढून त्यातील काही सिलेक्टेड, सतत तीन वेळा पाठोपाठ पोस्ट करणे याला ॲक्युट प्रकारचा सिंड्रोम, म्हणजे तुम्ही ही ॲडिक्ट होऊ शकता याबाबतचा हा अवेअरनेस असेल. आणि 15 च्या आसपास सेल्फी काढून ते पोस्ट करणे आणि सतत लोकांना त्यासंबंधी आपल्या रीएक्शन्स द्यायला भाग पडणे. हे क्रॉनिक सिंड्रोम आहे.

आता बघू या की हे असं का होतं ? मुळात दर्पणात, पाण्यात प्रतिबिंब पाहणे किंवा सेल्फी त स्वतःचे प्रतिरूप बघून खुश होणे नैसर्गिक बाब. पण त्याचा जेव्हा हा अतिरेक होतो त्यावेळेस सगळेच बिघडतं. याचं वैशिष्ट्य म्हणजे इतर नशा जेव्हा माणूस करतो तेव्हा त्याला ते माहिती असतं पण सेल्फी ची हौस जेव्हा तो भागवायला लागतो, त्यावेळी त्याला ते कळतही नाही.(ही पूर्णपणे नवीन नशा) परंतु त्याच्याही नकळत एक क्रिया मेंदूत घडत असते. व्यक्ती खुश झाला की डोपामाइन नावाचे एक रसायन त्याच्या मेंदूतून स्त्रवते. याला “प्लेजर हार्मोन “असे म्हणतात. पण अशी कल्पना करा की एखाद्या माणसाला सगळं हातात रेडीमेड दिलं आणि सांगितला आराम कर. तो नक्कीच आळशी होईल .कुठलेच काम करणार नाही. अगदी तसंच मेंदूचा होतं. डोपामाइनचे सिक्रेशन सतत होत राहते. आणि मग याची मेंदूला सवयच लागते. मग ते कुठल्या मार्गाने डोपामाइन मिळत आहे हे महत्त्वाचं राहत नाही आणि मेंदू सतत याची मागणी करत राहते, आणि व्यक्ती परत परत सेल्फी काढून खुश होत राहते. असं हे दुष्टचक्र सुरू होतं, कोणाच्याही नकळत. हे साहस करणाऱ्याला किंवा त्याला प्रोत्साहन देणाऱ्याला याची जाणीवही नसते. आणि परिणामतः नाहक जीव जातात. हा टोकाचा परिणाम वगळता इतरही अनेक दुष्परिणाम याचे आहे.

ते म्हणजे मानसशास्त्रीय भाषेत व्यक्ती हा नार्सिसिस्ट या व्यक्तिमत्व आजाराचा शिकार बनते. म्हणजे आपल्याशिवाय इतर कुणालाही किंमत न देणे किंवा महत्त्वाचा न समजणे आणि केवळ आपल्यालाच सर्वोच्च समजणे .स्वतःच्या सवयी बाबत आपल्यातील कमी असलेल्या गोष्टींबाबत त्या तो आतल्या आत दाबायला बघतो. आणि इतका ओव्हर कॉन्फिडनट होतो की आपल्या मनाचच करतो इतरांकडे मात्र दुर्लक्ष करतो पूर्णपणे. सगळ्यात असूनही एकटाच राहतो. जवळचे लोक असूनही आपली मनोदशा कुणालाही शेअर करत नाही. आणि मग कुठल्याही कायद्याचे नियमांचे पालन करण्याची जबाबदारी आपली नाही असं समजतो. सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम यावर सतत फोटो पोस्ट करून लोकांच्या कॉमेंट्स मिळवणे एवढेच काम राहते. आणि मुख्य म्हणजे त्याला त्याच्या काही त्रुटी सांगितल्या तर सहन होत नाही . अशा व्यक्ती भयंकर अशा वेळी. त्यांना फक्त स्वतःची तारीफ हवी असते.

एकूणच त्यांची विचारांची दिशा चुकत जाते. “मी “या विषयीचा विचार फक्त शरीर असाच भौतिकवादी केल्या जातो. आणि सौंदर्याच्या कल्पना केवळ बाह्य सौंदर्या पुरत्या मर्यादित राहतात. व्यक्ती केवळ स्वतःपुरता विचार करते, स्वतःच्याच कोशात राहते, नात्यांची आणि एकूणच विचारांची व्यापकता कमी होत जाते. विनाकारण स्पर्धा वाढते. आणि स्वतःचे मूल्य हे केवळ लाईकसवर judge केले जाते. नाहीतर व्यक्तीला इन्फरियरिटी कंपलेक्सला तोंड द्यावे लागते. व्यक्तीची दीर्घकालीन स्मरणशक्ती कमी होऊन प्रत्येक गोष्ट फक्त short-term मेमरी मध्ये ठेवायला व्यक्ती बघते.

फ्रेंड्स ! अगदी साध्या आणि सोप्या वाटणाऱ्या आपल्या या हौशीचा परिणाम इतका भयंकर असेल अशी कल्पनाही आपण करू शकत नाही, कधी केलेली ही नसते. पण याचा परिणाम केवळ आपल्या दैनंदिन जीवनावर असाच न होता व्यक्तीच्या मानसिकतेवर ,परस्परसंबंधांवर ,समाजावर, व्यक्तिमत्वावर ,विचारांवर आणि भावना व कृतीवर घडतो. नवीन काळातला ॲडिक्शनचा हा छुपा प्रकार आहे. यावरही उपाय आहे. “कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी” या मानसशास्त्रीय थेरपीच्या मदतीने व्यक्तींच्या विचारात आणि त्यामुळे आपोआपच भावना आणि कृतींमध्ये ही बदल घडवून आणता येतो. त्यामुळे आपण किंवा आपल्या मित्र मंडळामध्ये कोणीही किंवा कुटुंबीयांमध्ये नकळत कोणी सेल्फीची शिकार तर होत नाही ना याकडे प्रत्येकाने लक्ष द्यायला हवं आणि मुख्य म्हणजे तात्काळ समुपदेशकांची किंवा मानसोपचारतज्ञ ,सायको थेरापिस्त यांची मदत घेता येते, ती घ्यावी.

ह्या बातम्या पण वाचा :

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER