अमित भंडारी यांच्यावरील हल्लाप्रकरणी एक जण ताब्यात

क्रिकेटपडू अनूज देढावर संशय, भंडारी यांना डोक्यावर सहा टाके

Latest news on Amit Bhandarai Attack

नवी दिल्ली : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निवडसमितीचे प्रमुख व माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटी अमीत भंडारी यांच्यावर संघनिवडीत डावलल्याच्या कारणाने नाराज क्रिकेटपटूने गुंडांकरवी हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. सेंट स्टिफन्स कॉलेजच्या मैदानावर हा प्रकार घडला. त्यात अमित भंडारी यांच्या डोक्याला दुखापत झाली असून पायाला मार लागला आहे मात्र त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सुत्रांनी सांगितले. भंडारी यांच्या डोक्यावर सहा टाके घालावे लागल्याची आणि त्यांच्या पायाला फ्रॅक्चर असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी अनुज देढा नावाच्या क्रिकेटपटूवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. अनुजची संभाव्य संघात निवड न केल्याच्या कारणावरून गुंडांनी हॉकी स्टीक्ससह भंडारी यांच्यावर हल्ला चढवला. भंडारी यांना त्यांचे सहकारी सुखविंदरसिंग यांनी तातडीने संत परमानंद दवाखान्यात हलविले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अनुज देढासह एका हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे आणि इतर हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी गुन्हेगारांविरूद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगितले.

या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यात येत आहे. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार २३ वर्षाआतील संभाव्य खेळाडूंमध्ये स्थान न मिळाल्याने नाराज असलेल्या एका क्रिकेटपटूने हा प्रकार केला. यासंदर्भात आपण स्वत: दिल्ली पोलिस आयुक्तांशी बोललो असून दोषींना सोडले जाणार नाही. या प्रकारणात जे कोणी अडकलेले असतील त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल. या संदर्भात आम्ही पोलिसात अधिकृत तक्रार नोंदविणार आहोत असे शर्मा यांनी म्हटले आहे.

Latest news on Amit Bhandarai Attack

प्राप्त माहितीनुसार देढा हा गेल्या काही दिवसांपासून भंडारी यांना धमकावत होता. मात्र त्याने ज्या पद्धतीने हल्ला केला ते धक्कादायक असल्याचे निवडसमितीचे सदस्य सिध्दार्थ वर्मा यांनी सांगितले.

२३ वर्षाआतील संघाचे व्यवस्थापक शंकर सैनी यांनी या घटनेची वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, सेंट स्टिफन्स कॉलेजच्या मैदानावरील तंबूत मी सहकाºयासह भोजन करत होतो आणि भंडारी हे इतर निवडकर्त्यांसह आणि वरिष्ठ संघाचे प्रशिक्षक मिथुन मन्हास यांच्यासह चाचणी सामन्यात संभाव्य खेळाडूंची कामगिरी बघत होते. सुरूवातीला काही लोकं आले आणि ते भंडारी यांच्याकडे गेले.

त्यावेळी भंडारी व दोन जणांदरम्यान शाद्बिक चकमक झाली. मात्र ते लोकं निघून गेले मात्र त्यानंतर काही वेळातच अचानक सुमारे १५ जण हॉक़ी स्टीक, रॉड आणि सायकल साखळी घेऊन मैदानात दाखल झाले. त्यांना पाहून निवड चाचणीला आलेले खेळाडू व आम्ही भंडारी यांना वाचविण्यासाठी धावलो तेंव्हा हल्लेखोरांनी आम्हाला धमकावण्यास सुरूवात केली. त्यापैकी एक म्हणाला की तुम्ही यात पडू नका नाहीतर तुम्हालाही उडवून देऊ. त्यानंतर त्यांनी हॉक़ी स्टीक व रॉडसह अमित भंडारी यांना मारहाण केली ज्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असा सैनी यांनी घटनाक्रम सांगितला.

या प्रकाराने माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू गौतम गंभीर अतिशय संतप्त झाला आहे. व्टिटरवर आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना त्याने म्हटलेय की, देशाच्या राजधानीत असा प्रकार होणे हे लज्जास्पद आहे. ही गोष्ट दबली जाणार नाही याची आपण दक्षता घेऊ. या हल्यामागे जे कोणी क्रिकेटपटू असतील त्यांच्यावर आजन्म बंदीची आपली मागणी आहे.

अमित भंडारी हे जलद गोलंदाज असून त्यांनी भारतासाठी दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दिल्ली क्रिकेटसाठी त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.