पी.टी. उषा म्हणतात, नाम्बियार सरांना पद्म पुरस्कार मिळायला उशीरच झाला!

सुवर्णकन्या म्हणून ओळखली जाणारी भारताची नावाजलेली धावपटू पी.टी.उषा (PT Usha) यांनी त्यांचे प्रशिक्षक ओ.एम. नाम्बियार (OM Nambiar) यांना पद्मश्री (Padmashree) पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे; पण हा पुरस्कार त्यांना आधीच मिळायला हवा होता, तसा उशीरच झालाय, अशी खंतसुद्धा व्यक्त केली आहे. १९७७ ते १९९० या काळात जेव्हा पी.टी. उषा जागतिक पातळीवर एकामागून एक स्पर्धा जिंकत होती तेव्हा नाम्बियार सर हेच तिचे एकटे प्रशिक्षक होते.

ओ.एम. नाम्बियार यांनीच लॉस एंजेल्स ऑलिम्पिकच्या आधी उषाला ४०० मीटर हर्डल्सकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला होता आणि या ऑलिम्पिकमध्ये उषाचे या स्पर्धेत कांस्यपदक फक्त एक शतांश सेकंदाने हुकले होते.

नाम्बियार आता ८९ वर्षांचे असून ते त्यांच्या पाय्योली या गावी असतात. या गावाच्या नावावरूनच पी.टी.उषाला पाय्योली एक्सप्रेस म्हणूनही ओळखले जाते. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उषाने मंगळवारी सकाळीच नाम्बियार सरांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. नाम्बियार सरांनीच उषाला हुडकून काढत तिला जगातील आघाडीची ऍथलिट बनवले होते.

नाम्बियार सरांच्या भेटीबद्दल उषाने सांगितले की, “एका नातेवाइकाच्या लग्नासाठी मी सरांच्या घराजवळच गेले होते. तेथून लगेचच सरांना भेटायला त्यांच्या घरी गेले  आणि त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या. या भेटीने सर खूप आनंदित होते.”  नाम्बियार सर आता खूप थकले असल्याने आणि वार्धक्यामुळे सहसा घराबाहेर पडत नाहीत. पण जेव्हा केव्हा आम्ही भेटतो तेव्हा भरपूर आठवणी जाग्या होतात. त्यांच्या घरी पोहचल्यावरच ते आता ‘पद्मश्री’ असल्याचे मला समजले, असे उषाने सांगितले.

कुवेतमधील आशियाई मैदानी स्पर्धात मी ४०० मीटरचे सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर सरांना विश्वास आला की, मी ४०० मी. हर्डल्समध्ये चांगली कामगिरी करू शकते. म्हणून त्यांनी मला त्या स्पर्धाप्रकारावर लक्ष केंद्रित करायला सांगितले आणि लॉस एंजेल्स ऑलिम्पिकमधील कामगिरी घडली, असे उषा म्हणाली.

आपणही जगात बेस्ट ठरू  शकतो हा विश्वास त्यांनीच माझ्यात जागवला. त्या काळी आम्हाला ना चांगल्या सुविधा होत्या ना चांगला खुराक होता; पण नाम्बियार सरांची इच्छा आणि त्यांची आवड याने मला एक सफल ऍथलिट  बनवले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे ही आनंदाची गोष्ट आहे; पण त्यांना आधीच हा पुरस्कार मिळायला हवा होता, असे उषा यांनी म्हटले आहे.

१९८५ मध्ये जकार्ता येथे आशियाई स्पर्धात उषाने पाच सुवर्ण आणि एक कांस्यपदक जिंकले. त्यावेळी तिच्यासाठी कुणी फिजियो किंवा मसाजर नव्हता; पण नाम्बियार सरांनी त्यासुद्धा   जबाबदाऱ्या  पार पाडल्या होत्या. त्यामुळेच फक्त ५ दिवसांत आपण ११ शर्यती धावूनही यशस्वी ठरलो होतो, असे उषा सांगतात. नाम्बियार सर नसते तर मी देशासाठी एवढे यश मिळवूच शकले नसते. माझे सुदैव की, एवढी वर्षे ते माझे प्रशिक्षक होते. अगदी शून्यातून त्यांनी मला घडवले, असे उषा यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञतापूर्वक उद्गार काढले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER