पुण्यात देर आये दुरुस्त आये…

Ajit Pawar & Murlidhar Mohol

Shailendra Paranjapeदेर आये दुरुस्त आये, म्हणावं अशी स्थिती पुण्यामधे आहे. याच संपादकीय लेखांमधून जवळपास पंधरा दिवसांपासून पुण्यात विकेंद्रित पद्धतीनं विचार व्हावा आणि करोनाग्रस्त आणि करोनामुक्त भागांसाठी एकच न्याय असू नये, हे आम्ही मांडत होतो. पण सरकारनं आता तिसरा लॉकडाऊन अर्ध्यावर आला असताना का होईना, करोनाग्रस्त भागाला पत्र्यांच्या भिंती घालून बंदिस्त करायचं ठरवलंय, हेही नसे थोडके….

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल रात्री सर्व अधिकारी तसंच महापौर यांच्याबरोबर एक सविस्तर बैठक घेऊन उपाययोजना करण्याचं ठरवलंय. त्यात कंटेन्मेंट झोन्समधे १०ते१७मेपर्यंत लॉकडाऊन खूपच कडक करण्याचं ठरवलंय. त्यामुळे करोना पसरण्याचं प्रमाण अटोक्यात यावं ही अपेक्षा. त्याबरोबरच प्रसासकीय पातळीवर विभिन्न परस्परविसंगत आदेश न येता एकसूत्री कारभार होईल, असंही वाटतंय कारण अजित पवार यांनी लक्ष घातलं तर प्रशासन नीट काम करेल, असं भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं होतं. बघू या…

देशात, राज्यात आणि पुण्यातही करोनाग्रस्तता एकाच वेळी सगळीकडं वा एकसमान पद्धतीनं सगळीकडे वाढलेली नाही. या पद्धतीनं ना लागण झालीय ना फैलाव, पण करोना पसरण्याच्या पॅटर्नचा अभ्यास तज्ज्ञ मंडळी करतच असतील आणि त्यातूनही काही उपाययोजना केल्या जात असतीलच. पण पुण्यासारख्या शहरात विशिष्ट भागांमधे करोनाग्रस्तता तुलनेनं अधिक असेल आणि भौगोलिकदृष्ट्या असे भाग इतर भागांपासून विलग करणं वा आयसोलेट करणं सहज शक्य असेल, तर हे उपाय वेळीच का केले जाऊ नयेत, हाही प्रश्न आहे.

करोनाचं विश्वव्यापी, देशव्यापी, राज्यव्यापी आणि शहर, गल्ली आसमंतव्यापी संकट असताना कालचं विसरून आज आणि उद्याचा विचार करायला हवा. त्यामुळं पुण्यनगरीत करोनाग्रस्तता अधिक असलेल्या आणि शासकीय भाषेत कंटेन्मेंट झोन असलेल्या भागांमधे पत्रे घालून हा भाग बंदिस्त करण्याचा उपाय केला जाणार आहे. त्याद्वारे १७मे या दिवशी तिसरा लॉक डाऊनचा काळ संपत असताना या करोनाग्रस्त भागांमधे मात्र लॉक डाऊन ३०मेपर्यंत वाढवला जाईल आणि त्या भागांमधे तो क़डकपणे अंमलबजावणीत आणला जाईल, अशी चिन्हं आहेत.

करोनाग्रस्त भागांमधे अगदी जीवनावश्यक वस्तूदेखील सरकार घरोघर पोहोचवेल आणि कोणतंच दुकान उघडलं जाणार नाही, जेणेकरून करोना संसर्ग पसरणार नाही, याची कमाल काळजी घेतली जाईल. पण या सर्व भागांमधे विशेषतः झोपडपट्ट्या तसंच नाना पेठ, भवानी पेठ, महात्मा फुले पेठ म्हणजे पूर्वीची गंज पेठ, रविवार पेठ, गुरुवार पेठ यांचा लोकसंख्या घनता जास्ती असलेला भाग, टिंबर मार्केट, कोंढव्यातला असा भाग, येरवड्यातला भाग, पाटील इस्टेट झोपडपट्टी, मार्केट यार्ड भागातल्या झोपडपट्ट्या या सर्व भागात स्वच्छतागृहांची सोय सामायिक वा कॉमन टॉयलेट्स अशी आहे. अशा ठिकाणी संसर्ग वाढण्याची भीती लक्षात घेऊन काही उपाययोजना केल्या जातील का…

पत्रे लावून करोनाग्रस्तता नियंत्रणात येते का हे १७मेनंतर आणि पुढच्या आठवड्याभरात कळेलच. पण येत्या आड दिवसात करोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवलीय. त्यामुळं किमान १७मेपर्यंत संयम पाळून घराची लक्ष्मणरेखा पाळायला हवी अन्यथा हरीणरूपी मारिच आणि साधू-भिक्षेकरीरूपी रावण आपली वाट बघताहेतच.