लतादीदींनी थोपटली सुबोधची पाठ !

Lata Mangeshkar appreciate Subodh Bhave.jpg

कलाकारांना काय हवं असतं? कलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद… त्यांच्या क्षेत्रातील अनुभवी व कामाने प्रसिद्धी मिळवलेल्या ज्येष्ठांकडून कौतुकाची पावती, हो ना? आणि जेव्हा अशी शाबासकी गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्याकडून मिळाली तर तो क्षण कोणत्याही कलाकारासाठी अविस्मरणीय असतो. सुबोध भावे (Subodh Bhave) सध्या ‘सातवे आसमान पे’ आहे; कारण ‘बालगंधर्व’ सिनेमातील अभिनयासाठी खुद्द लतादीदींनी त्याची पाठ थोपटली आहे. गेल्या काही वर्षांत सुबोध भावे आणि प्रयोगशील वेगळेपण यांचे समीकरण तयार झाले आहे.

पठडीतल्या सिनेमांना फाटा देत सुबोध अभिनय असेल किंवा दिग्दर्शन असेल, दोन्ही माध्यमात सतत काहीतरी वेगळं शोधण्याचा आणि प्रेक्षकांना वेगळे देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा हा वेगळेपणाचा प्रवास नजरेखालून घातला तर त्यामध्ये ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाचे सिनेमा माध्यमांतर करणं हेदेखील मोठं धाडस होतं. आणि ते लीलया पेलत त्याने संगीत नाटकावर आधारित सिनेमा हा विचार फक्त मनातच न ठेवता त्यावर सिनेमा काढून असा सिनेमादेखील हिट होऊ शकतो हे दाखवून दिले. लोकमान्य टिळक यांचा जीवनपट उलगडणाऱ्या ‘लोकमान्य’ या सिनेमात सुबोधने केलेल्या लोकमान्य टिळक या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरले. तीच गोष्ट ‘बालगंधर्व’ या सिनेमाची. ‘बालगंधर्व’ सिनेमा पडद्यावर येण्यापूर्वी सुबोधने केलेला अभ्यास, त्यासाठी आवश्यक वाचन हे त्याने अनेकदा मुलाखती आणि संवादातून सांगितले आहे.

ही बातमी पण वाचा : आवाजाचे जादूगार जगजितसिंग; लता मंगेशकर यांनी सुद्धा तिकीट काढून ऐकले होते…

याचा अर्थ कुठलीही गोष्ट हातात घेण्यापूर्वी सुबोध त्याचा इतका अभ्यास करतो आणि म्हणूनच त्याची प्रत्येक कलाकृती ही परिपूर्ण असते. सुबोध आणि बालगंधर्व या दोघांचं सिनेमाच्या माध्यमातून चांगलं नातं जडलं. ह्या नात्याची प्रशंसा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सुबोधला संदेश पाठवून केली. लतादीदींनी संदेशात म्हटले आहे की, मी पहिल्यांदाच बालगंधर्व हा सिनेमा पाहिला. नाट्यसंगीतातील महान कलाकार बालगंधर्व यांच्यावर आधारित सिनेमा आणि सुबोध भावेचा त्यातील अभिनय मी पहिल्यांदाच पाहिला. गायनाच्या निमित्ताने माझी बालगंधर्वांची तीन वेळा भेट झाली होती. ते नेहमी आपुलकीने आणि प्रेमाने बोलून आशीर्वाद द्यायचे. मी माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी त्यांना शिवाजी पार्कला बोलवलं होतं. तिथे येऊन त्यांनी दोन भजनं गायली होती.

हा सिनेमा पाहताना त्या सर्व आठवणी ताज्या झाल्या. त्यांच्या आयुष्यातील ज्या गोष्टी मला माहिती नव्हत्या त्या हा सिनेमा पाहिल्यावर समजल्या. हा सिनेमा खूपच छान झाला आहे. विशेषतः बालगंधर्व पडद्यावर साकारणारा अभिनेता सुबोध भावे यांनी ज्या पद्धतीने ही भूमिका झोकून देत केली आहे ती खरोखरच एक अभिनेता एखाद्या भूमिकेत शिरणे काय असते हे दाखवून देणारी आहे. बालगंधर्वांचा सिनेमा म्हणजे सगळ्यांचे कान या सिनेमातील गाण्याकडे लागून राहिलेले असणार हे ओघाने आलेच. त्यामुळे या सिनेमासाठी पार्श्वगायन केलेले गायक आनंद भाटे तसेच इतर सगळ्या कलाकारांनी आपली कामं चोख बजावली आहेत. अशी प्रतिक्रिया देत लता मंगेशकर यांनी वसंत देसाई, बालगंधर्व, बेगम अख्तर आणि मोगुबाई कुर्डीकर यांच्यासोबतचा एक फोटोही सुबोध भावेला शेअर केला आहे. आता लतादीदींकडून सोशल मीडियावर आलेला हा संदेश पाहिल्यानंतर सुबोध भावेला खरं तर टेन्शन आलं होतं की आता त्यांना कुठल्या शब्दात प्रतिक्रिया द्यायची.

खरे तर खूप आनंदही झाला होता; पण अभिप्राय लतादीदींचा होता आणि त्याला उत्तर देताना सुबोध भावेला प्रचंड अभिमान वाटत होता. त्यानेही लतादीदींना उत्तर लिहिताना असं म्हटलं आहे, बालगंधर्वांचा सहवास ज्यांना ज्यांना लाभला ते सगळेच कलाकार कर्तृत्व आणि कलेने जितके मोठे होते तितके मनानेही मोठे आहेत. आणि लतादीदी ह्या त्यांच्यापैकीच एक आहेत. लतादीदींकडून माझ्या ‘बालगंधर्व’ या सिनेमाला, त्यातील माझ्या अभिनयाला शाबासकी मिळणं हा माझ्यासाठी आयुष्यभर जपून ठेवावा असा सन्मानाचा ठेवा आहे. आणि काय हवं आयुष्यात? आयुष्य सार्थकी लागलं असं मला वाटतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER