गेल्या वर्षी शेतक-यांच्या बांधावर गेलात, आता मुख्यमंत्री आहात, तातडीने मदत करा : राजू शेट्टी

Raju Shetti - CM Uddhav Thackeray

मुंबई : गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांनी शेतक-यांच्या बाधावर जाऊन सरकारने पंचवीस हजार रुपये हेक्‍टरी मदत करावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी ते मुख्यमंत्री नव्हते. मात्र आता ते मुख्यमंत्रीपदावर आहेत. आता पंचनामे बाजूला ठेऊन त्यांनी मोडून पडलेल्या शेतकऱ्याला आधार द्यावा तसंच भरीव आर्थिक मदत द्यावी”, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले.

परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेलाय. शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. पूर चक्रीवादळ आणि आता ओला दुष्काळ यासारख्या संकटातून शेतकरी जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून त्यांना लगोलग मदत करावी”, असं राजू शेट्टी म्हणाले.

राजू शेट्टी यांनी केंद्रसरकारवरही निशाणा साधला. म्हणाले, “केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी. महाराष्ट्रातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीशी झुंझत असताना केंद्र सरकार मात्र त्यांची जबाबदारी झटकत आहे”, अशी टीका शेट्टी यांनी केंद्र सरकारवर केली.

गेल्या 3 ते 4 दिवसांत पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. त्याला आता सरकारच्या मदतीची गरज आहे. अशावेळी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन बळीराजाला तातडीने मदत देऊन आधार द्यावा”, असं ते म्हणाले.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीचा तडाखा बसला. बुधवारी झालेल्या पावसाने भीमा व कृष्णा नदीला पूर आल्याने पंढरपूर व सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफ पथकांची मदत घेण्यात आली. राज्यातील लाखो हेक्टरवरील सोयाबीन व भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तूर, भात या पिकांनाही अविृष्टीचा तडाखा बसला. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने अनेक ठिकाणची वाहतूकही बंद करण्यात आली होती. पाऊस अजून सुरूच असून हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आणखी चार दिवस असाच कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे राज्यात मृत्यूचं तांडव पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी तब्बल 44 जणांनी गमावला आहे. सर्वाधिक जीवितहानी पश्चिम महाराष्ट्रात झाली आहे. अतिवृष्टीदरम्यान पुणे विभागात 28 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 27 जणांचे मृतदेह सापडले आहेत. एकाचा शोध सुरु आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER