… मात्र २६ वर्षांत जे झाले नाही ते गेल्या आठ दिवसांत झाले !

पुणे :-  कीर्तनकार इंदोरीकर महाराज त्यांच्या कीर्तनातील एका विधानाने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. असे असले तरी त्यांचे कीर्तनाचे ठरलेले कार्यक्रम थांबलेले नाहीत. पिंपरी चिंचवडच्या मोशी इथं शिव जयंतीनिमित्त आयोजित कीर्तनामध्ये महाराज बोलत असताना त्यांनी त्यांच्या लिंगभेदाच्या विधानावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ‘मी जे गेले २६ वर्षे बोलतोय तेच आताही बोलतोय. गेल्या २६ वर्षांत  कीर्तनात जे झाले नाही ते गेल्या आठ दिवसांत झाले. पण माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला.’  या कीर्तनाला प्रसारमाध्यमांना परवानगी नाकारण्यात आली होती. एवढेच नाही तर कोणत्याही प्रकारे चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही  चित्रीकरण झाले, असेही  इंदोरीकर   महाराज म्हणाले.

अंनिसच्या दाभोळकरांचा इंदुरीकर महाराजांना सल्ला

 नवी मुंबईतल्या उरण येथे जानेवारी महिन्यात अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला. २ जानेवारीला झालेल्या कीर्तनात  इंदोरीकर   महाराजांनी “कपाळ म्हणजे काय याचं उत्तर सांगतो. स्त्रीसंग समतिथीला झाला तर मुलगा होत असतो. स्त्रीसंग जर विषमतिथीला झाला, तर मुलगी होत असते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. याचा पुरावा विचाराल तर पुलश्य नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या स्त्रीसोबत सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आले आणि आदिती नावाच्या ऋषीनं पवित्र दिवशी संग केला, तर त्याच्यापोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकश्यपूनं नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.” असे म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर सर्वच स्तरांतून त्यांच्यावर टीका व्हायला लागली. त्यानंतर  इंदोरीकर  यांनी स्पष्टीकरणही दिले आणि याला शास्त्राचा आधार असल्याचे सांगितले.

मात्र,  इंदोरीकर   महाराजांविरोधात नगरमध्ये तक्रार दाखल झाली असून उद्या तृप्ती देसाईही त्यांच्याविरोधात तक्रार द्यायला नगरमध्ये जाणार आहेत. तृप्ती देसाईंनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.  इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्या करत आहेत. यासाठी त्या मंगळवारी नगरमध्ये दाखल होणार आहेत. त्यांना उत्तर देण्यासाठी  इंदोरीकर  समर्थकांनीही ‘चलो नगर’ अशी मोहीम हाती घेतली आहे. बीडमध्ये  इंदोरीकर   महाराजांचं रविवारी कीर्तन झालं, त्याही वेळी त्यांचं जंगी स्वागत झालं आणि कीर्तनात ‘आय सपोर्ट  इंदोरीकर ‘  असे बोर्डही झळकले.