श्रीलंकेच्या लसीथ एम्बुलदेनियाचे हे विक्रम नक्कीच तुम्हाला चकीत करतील

Lasith Embuldenia

आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात अलीकडे लसीथ एम्बुलदेनिया (Lasith Embuldenia) हे नाव फार चर्चेत आहे. श्रीलंकेचा (Sri Lanka) हा डावखुरा फिरकी गोलंदाज अद्याप फक्त आठच कसोटी सामने खेळलेला आहे आणि त्याने फार काही अफलातून वगैरे कामगिरी केलेली नसली तरी जे काही यश तो इंग्लंडविरुध्दच्या मालिकेत मिळवतोय आणि त्यातून जे काही विक्रम घडताहेत त्यामुळे त्याचे नाव लक्षात राहतेय.

इंग्लंडविरुध्दच्या दुसऱ्या कसोटीत गॉल (Galle) येथे त्याने 137 धावात 7 बळी मिळवले. यात काही विशेष नसले तरी त्याच्या या 7 पैकी 5 विकेटसाठीचे झेल लाहिरू थिरीमाने (Lahiru Thirimane) यानेच घेतले ही मात्र विशेष बाब ठरली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या डावात एक गोलंदाज व एकाच क्षेत्ररक्षकाच्या (विकेटकीपर सोडून) कॉम्बिनेशनने निम्मा संघ गारद केला.

इंग्लंडचे झॕक क्रऊली (Zack Crawley) या सलामी फलंदाजासह डॕन लॉरेन्स, सॕम करन, डॉम बेस आणि मार्क वूड हे पाच फलंदाज झे. थिरीमाने गो. एम्बुलदेनिया या पध्दतीने बाद झाले. कसोटी सामन्याच्या एका डावात एवढे फलंदाज कधीच एका कॉम्बिनेशनला बळी पडले नव्हते.

यष्टीरक्षक – गोलंदाजाच्या कॉम्बिनेशनने तीन वेळा अशाप्रकारे निम्मा संघ माघारी धाडला आहे पण क्षेत्ररक्षक – गोलंदाज कॉम्बिनेशनचे हे असे यश पहिलेच..

यष्टीरक्षक -गोलंदाजांचे कॉम्बिनेशनने एका डावात बाद केलेले पाच फलंदाज कधी ते बघू या

1980- झे. बाॕब टेलर गो. बोथम- विरुध्द भारत
1998- झे.मार्क बाऊचर गो. डोनाल्ड – विरुध्द इंग्लंड
2004- झे. गिलख्रिस्ट गो.क्रस्प्रोविक्झ – विरुध्द श्रीलंका

आणि आता झे. थिरीमाने गो.एम्बुलदेनिया हे घडले आहे.

एम्बुलदेनियाचा चकित करणारा हा केवळ एकच विक्रम नाही तर प्रतिस्पर्धी संघाच्या दोन्ही सलामी फलंदाजांना लागोपाठ तीन डावात एकेरी धावात बाद करणारा तो एकमेव गोलंदाज आहे. इंग्लंडचे सलामी फलंदाज झॕक क्रउली व डाॕमिनीक सिबली (Dominic Sibley) यांना त्यानेच अनुक्रमे 9, 8 ,5 आणि 4, 2, 0 अशा धावांवर बाद केले आहे.

एवढेच नाही तर गॉल कसोटीच्या पहिल्या डावात लंकन गोलंदाजांना ज्या 9 विकेट मिळाल्या त्यापैकी 7 विकेट एकट्या लसिथ एम्बुलदेनियाच्या होत्या. योगायोगाने इंग्लंडच्या डावातही याचप्रकारचे योगदान जो रुटचे राहिले. इंग्लंडच्या 344 धावांपैकी 186 धावा त्याच्या एकट्याचच राहिले. म्हणजे लसिथ व रुट या दोघांनीही आपल्या संघाच्या कामगिरीत एकट्यानेच निम्मेपेक्षा अधिक योगदान दिले.

अशाच योगदानाची म्हणजे संघाच्या किमान 400 धावात एकाच फलंदाजाच्या 180 धावा आणि गोलंदाजाच्या 7 किंवा अधिक विकेट असे ज्याला सिंहाचा वाटा अशी मोजकीच उदाहरणे आहेत.

त्यात 1999 मध्ये भारताविरुध्द पाकिस्तानच्या 376 पैकी 188 धावा एकट्या सईद अन्वरने केल्या हौत्या तर जवगल श्रीनाथने 86धावात 8 गडी बाद केले होते. 2001 मध्ये आॕस्ट्रेलियाच्या मॕथ्यु हेडनने 391 पैकी 203 धावांचे योगदान दिले होते तर हरभजनसिंगने 133 धावात 7 गडी बाद केले होते. 2001 मध्ये वेस्ट इंडीजच्या ब्रायन लाराने 390 पैकी 221 धावा केल्या होत्या तर चामिंडा वासने त्याच डावात 120 धावात 7 गडी बाद केले होते. यानंतर 2014 मध्ये मोहम्मद हाफिजने पाकिस्तानच्या 351 पैकी 197 धावा केल्या त्याच डावात मार्क क्रेगने 94 धावात 7 बळी मिळवले होते आणि आता गॉल कसोटीत जो रुटने 186 धावा केल्या तर लसिथ एम्बुलदेनिया याने 7 बळी मिळवले आहेत.

24 वर्षीय लसीथ एम्बुलदेनिया केवळ आठच कसोटी सामने खेळलाय, अद्याप वन डे आणि टी-20 चा तो एकही आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला नाही पण या छोट्याशा कारकिर्दीतच त्याने असे वेगळे विक्रम केले आहेत जे चकित केल्यावाचून रहात नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER