सोमय्यांची मागणी : गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वसुली’ गँग; आव्हाडांचीही चौकशी करा !

Jitendra Awhad - Kirit Somaiya - Maharashtra Today

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला (Sachin Vaze) दरमहिन्याला १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी हा आरोप केला आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात उडालेला धुराळा अद्याप शमलेला नसतानाच भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गृहनिर्माण खात्यावर पर्यायाने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे. गृहनिर्माण खात्यातही मोठं वसुली रॅकेट सुरू असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आशीर्वादाने एसआरए, म्हाडा, बीएमसी (BMC) इथं १०० बिल्डरची यादी, १०० आरटीआय, मंत्री महोदयांचे आदेश घेऊन प्रवीण कलमे हे गेल्या काही महिन्यांपासून वसुली गँग चालवत आहेत. त्याबाबत किरीट सोमय्या यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त महासंचालक प्रभात कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. यावेळी काही पुरावेही दिल्याचा दावा सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे.

१०० रुपये प्रतिफूट हा सध्याचा एसआरए, म्हाडाचा बिल्डरांसाठी दर चालत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रतिमहिना १०० कोटी रुपये वाझे गँगकडून हवे असतात तर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे वाझे म्हणजे प्रवीण कलमे हे महापालिका, म्हाडा, एसआरएमध्ये १०० बिल्डर्सच्या विरोधात १०० आरटीआय करतात. त्यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड त्वरित अहवाल सादर करावा, असे आदेश देतात. लगेच एसआरए असो, म्हाडा असो यांचे ‘वसुली गँग’चे अधिकारी कामाला लागतात. प्रवीण कलमेला घेऊन हे अधिकारी प्रत्यक्ष साईट व्हिजीट करतात. ठाकरे सरकारची अजून एक वसुली गँग. या प्रकरणात मंत्रालयात तक्रार केल्यानंतर काही दिवस ही वसुली गँग शांत होती. आता पुन्हा वसुली गँगचे काम जोरात सुरू आहे. कलमे हे ‘अर्थ’, ‘आकांक्षा’ या बोगस एनजीओच्या नावाने पत्र देतात आणि गृहनिर्माणमंत्री त्याच्यावर निर्देश देतात, असा आरोप सोमय्या यांनी केला.

सोमय्या यांनी या प्रकरणात प्रभात कुमार यांच्याकडे तक्रार आणि १०० पानांचे पुरावे दिले आहेत. त्याचबरोबर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, प्रवीण कलमे, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित अधिकारी, म्हाडाचे अधिकारी यांची चौकशी करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या गंभीर आरोपांवर आता जितेंद्र आव्हाड काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button