ब्रायन लाराने शेवटून दुसऱ्या चेंडूवर ‘तो’ चौकार मारला नसता तर…

Brain Lara

सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये आतापर्यंत ५०० वर धावांची वैयक्तिक खेळी करणारा एकच फलंदाज आहे, तो म्हणजे ब्रायन लारा. इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये १९९४ साली वॉर्विकशायरसाठी डरहमविरुद्ध त्याने ही नाबाद ५०१ धावांची विक्रमी खेळी केली होती. अनिर्णीत राहिलेल्या या सामन्याच्या शेवटी लारा ५०१ धावांवर नाबाद परतला होता आणि त्याने हनिफ मोहम्मद यांचा १९५८-५९ मधील कैद-ए-आझम ट्रॉफीच्या सामन्यातील ४९९ धावांच्या खेळीचा विक्रम मोडला होता. परंतु एकवेळ अशी होती की ब्रायन लारा हा विक्रम करणार की नाही याची खात्री नव्हती आणि तो ४९७ धावांवरच नाबाद परतणार अशी स्थिती होती. सामन्यातील शेवटून दुसऱ्या चेंडूवर त्याने चौकार मारला नसता तर तो ४९७ धावांवरच नाबाद परतला असता…

मग हे झाले कसे? तर या सामन्यात डरहमने ८ बाद ५५६ धावांवर डाव घोषित केल्यावर वॉर्विकशायरकडूनही दमदार फलंदाजी झाली. दुसऱ्या दिवसअखेर त्यांची धावसंख्या २ बाद २१० होती आणि लारा १११ धावांवर नाबाद होता. तिसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. पुढचा दिवस विश्रांतीचा आला आणि सामन्याच्या चौथ्या व शेवटच्या दिवशीही वॉर्विकशायरची दमदार फलंदाजी सुरूच राहिली.

त्यामुळे सामन्यात निर्णयाची शक्यता नाही आणि सामना अनिर्णीत सुटणार हे स्पष्ट होताच पंचांंनी नियमानुसार वेळेच्या अर्धा तास आधी खेळ संपविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे झाले काय की, त्यावेळी ४९७ धावांवर नाबाद असणाऱ्या ब्रायन लाराला आता फलंदाजीसाठी केवळ एकच षटक मिळणार होते. जॉन मॉरिस हा गोलंदाज ते षटक टाकणार होता. त्यामुळे आता या शेवटच्या षटकात लारा ५०० धावांचा मैलाचा दगड गाठणार की नाही याची उत्सुकता वाढली.

जॉन मॉरिसच्या त्या षटकातील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरही लाराला धाव घेता आला नाही. तो ४९७ धावांवरच अडकून पडला. आता निदान चौथ्या चेंडूवर तरी तो काहीतरी करेल असे वाटत असताना मॉरिसने बीमर चेंडू टाकला आणि पुन्हा एकदा लारा ४९७ धावांवरच राहिला. आता सामन्यातील फक्त दोनच चेंडू उरले आणि लारा नाबाद ४९७ वरच. ५०० धावा होणार की नाही याची उत्कंठा शिगेला पोहचली. अशा वेळी जॉन मॉरिसने षटकातील पाचवा चेंडू आखूड आणि थोडा वाईड टाकला आणि लाराने ही सुवर्णसंधी सोडली नाही. एक सुंदर कट… चेंडू सीमापार आणि क्रिकेट इतिहासात ५०० धावांची खेळी करणारा पहिला फलंदाज अशी ब्रायन लाराची नोंद झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER