आंबेडकरांनी केलेली कायदेभंगाची भाषा जनतेला फूस देणारी – संजय राऊत

मुंबई : मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीच्या  (VBA) कार्यकर्त्यांचे पंढरपुरात आंदोलन सुरू आहे. विठ्ठल मंदिर परिसरात वंचितच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. तसेच या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंदिरं सुरू करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलेली कायदेभंगाची भाषा म्हणजे जनतेला एक प्रकारे फूस देणारी आहे, अशी टीका करतानाच आंबेडकरांनी पुकारलेल्या पंढरपुरातील आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे, असा दावा राऊत यांनी केला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली.

मंदिरं बंद ठेवणं किंवा मंदिरांना एवढे महिने टाळं लावणं हे कोणी आनंदाने करत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि संपूर्ण सरकार हे टप्प्याटप्यानं अनेक गोष्टी सुरू करत आहेत. लवकरच मंदिरं, रेल्वे सुरू करण्याचा विचार करण्यात येईल. त्यासाठी विरोधकांनी संयम बाळगायला हवा. महाराष्ट्रातील जनतेवर उपकार करा, असं राऊत म्हणाले. तिथे हजारो लोक जमली आहेत. त्यातून संक्रमण वाढू शकतं. त्यामुळे हे आंदोलन सकारात्मक नाही. प्रकाश आंबेडकर हे संयमी नेते आहेत. ते कायद्याचे जाणकार आणि अभ्यासक आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला कायदा आणि घटना दिली, त्यांचे ते वारसदार आहेत. अशा प्रमुख व्यक्तीकडून या परिस्थितीमध्ये आरोग्यविषयक आणीबाणी असताना कायदेभंगाची किंवा नियमभंगाची भाषा करणं म्हणजे लोकांना हुसकावण्यासारखं आहे. तरी मला खात्री आहे की, यामधून मुख्यमंत्री आणि विरोधक एकत्रितपणे मार्ग काढतील. पण कोणीही कायद्याचं पालन करणार नाही, अशा प्रकारची भूमिका निदान आरोग्यविषयक प्रश्नावर घेऊ नये, असेही राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER