‘गोपाळ’साठी ललितला मिळाली होती खास भेट

Lalit Prabhakar

भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी (Anandibai Joshi) यांचा जीवनप्रवास पडद्यावर दाखवणाऱ्या आनंदी गोपाळ (Anandi Gopal) या सिनेमाने गेल्या वर्षी रसिकमनावर गारूड केलं. या सिनेमात आनंदीबाईंना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे त्यांचे पती गोपाळराव यांचे योगदान खूप मोलाचे होते. या भूमिकेचे शिवधनुष्य पेलणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर ( Lalit Prabhakar) याचे आयुष्यही या भूमिकेने बदलून गेले. नुकताच या सिनेमासाठी ललितला उत्कृष्ट अभिनेता म्हणून झी गौरव पुरस्कार मिळाला. तर स्माइल प्लीज या सिनेमासाठी उत्कृष्ट सहकलाकार म्हणूनही ललितला पुरस्कार मिळाला. एकाचवेळी दोन पुरस्कार मिळणे ही त्याच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट तर आहेच पण एका विशिष्ट काळातील गोपाळराव साकारण्यासाठी केलेल्या मेहनतीला मिळालेल्या कौतुकाचे आठवणीतले क्षण ललितने शेअर केले. त्यामध्ये एका चित्रपटगृहातील प्रोजेक्टरचालकाकडून बक्षीस म्हणून मिळालेले दोनशे एक रूपये ही पडद्यावरच्या गोपाळरावांना मिळालेली खास भेट आहे असं सांगत ललितने ही आठवण सांगितली.

एखाद्या कसलेल्या अभिनेत्याचा प्रवास जसा योग्य दिशेने होतो तसाच काहीसा मार्ग ललितने निवडला. सुरूवातीला प्रायोगिक रंगभूमी, नंतर व्यावसायिक नाटक, नाटकातील प्रयोग, टीव्ही मालिका आणि मोठा पडदा असा एकेक पायरी चढत ललितने आनंदीगोपाळ या वेगळ्या धाटणीच्या सिनेमासाठी बक्षीस मिळवण्यापर्यंत मजल मारली. कारकीर्दीच्या पहिल्या दहा वर्षाच्या आत गोपाळरावांसारखी सशक्त व्यक्तीरेखा साकारण्यासाठी प्रायोगिक रंगभूमीचा अनुभव कामी आल्याचेही ललित अभिमानाने सांगतो. गेल्या आठवड्यात त्याने झी गौरव पुरस्कार स्वीकारल्यापासून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. यानिमित्ताने त्याच्या डोळ्यासमोरून आनंदीगोपाळचा पटही तरळला. जेव्हा आनंदीगोपाळ हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा एका चित्रपटगृहात आम्हा सर्व कलाकारांना सिनेमा पाहण्यासाठी आणि प्रेक्षकांची मतं जाणून घेण्यासाठी जायचं होतं. ठरल्याप्रमाणे कलाकार येणार आहेत हे प्रेक्षकांना सुरूवातीला कळू नये यासाठी सिनेमा सुरू झाल्यानंतर आम्हाला थिएटरमध्ये पाठवण्यात आलं. सिनेमा संपल्यानंतर आम्ही प्रेक्षकांशी संवाद साधला. गर्दीतून वाट काढत एक पन्नाशीची व्यक्ती ललितजवळ आली आणि त्यांनी खिशातून दोनशे एक रूपये काढून ललितला गोपाळरावांच्या भूमिकेवर खूश होऊन बक्षीस म्हणून दिले. ती व्यक्ती म्हणजे त्या चित्रपटगृहात गेल्या अनेक वर्षापासून प्रोजेक्टरचालक म्हणून काम करणारा कर्मचारी होता. पैसे नको म्हणत ललितने शुभेच्छा स्वीकारल्या. पण ते ललितला म्हणाले, गेले कित्येक वर्ष मी प्रोजेक्टररूममधून सिनेमा पडद्यावर सोडण्याचे काम करतो, पण आजवर एखाद्या व्यक्तीरेखेत इतका खोलवर घुसलेला अभिनेता मी पाहिला नाही. मला तू साकारलेले गोपाळराव खूप आवडले…हे बक्षीस त्या गोपाळरावांसाठी आहे. ललितला त्या दोनशे रूपयांची खरी किंमत कळाली आणि त्याने ते बक्षीस घेतले. आनंदीगोपाळ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट नायकाचा पुरस्कार घेताना ललितला त्या थिएटरमध्ये मिळालेल्या दोनशे रूपयांच्या बक्षीसाची आठवण आणि ललित भावूक झाला.

ललित प्रभाकर हा मूळचा धुळ्याचा. कल्याणमध्येच त्याचे बालपण गेले. लहानपणापासून मुलाला अभिनयाची आवड आहे हे ओळखून त्याच्या शिक्षक असलेल्या आईबाबांनी त्याला पाठबळ दिले. मिती कल्याण नाट्यसंस्थेत अभिनेता म्हणून ललित घडला. अभिनयात करिअर करायचं असलं तरी शिक्षण पूर्ण कर हा आईबाबांचा आग्रह होता. बिर्ला कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेऊन ललित रंगभूमीवरही कार्यरत होता. तक्षकयाग या नाटकातून तो व्यावसायिक रंगभूमीवर आला. इनव्हिजिबल सिटीज या नाटकाचे मराठी भाषांतर करून त्याचे अनेक प्रयोग ललितने केले. सध्या त्याचे बारा गावच्या भानगडी हे यू ट्यूब चॅनेल जोरात सुरू आहे. केंद्र सरकारकडून युवा कलाकारांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी देशातील तीस मुलांमधून ललितची निवड झाली आहे. कविता, नाट्यदिग्दर्शन यामध्ये रस असलेल्या ललितला भटकायला खूप आवडतं. सोशल मीडियावर चॅटिंग करण्यापेक्षा त्याला माणसांना भेटायला आवडतं. जिवलगा या मालिकेतून त्याचे टीव्हीवर पदार्पण केलं. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेने त्याला खरी ओळख दिली. आभास हा, दिल दोस्ती दुनियादारी, कुंकू या मालिकेतील त्याच्या भूमिका गाजल्या. टॉकीज हाऊस या शोचे अँकरिंगही त्याने केलेय. चि व चि.सौ.का. या सिनेमातून तो पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकला. स्माइल प्लीज, टीटीएमएम, हम्पी हे हटके सिनेमे ही ललितची खासियत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER