तब्बल ८७ वर्षांनंतर ‘लालबागच्या राजा’चे दर्शन नाही

Lalbaugcha Raja

मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा गणपती उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता ‘देश हाच देव’ मानून यंदा आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे. त्यामुळे भाविकांना तब्बल ८७ वर्षांनंतर ‘लालबागच्या राजा’चे दर्शन होणार नाही.

लालबागचा राजा मंडळाच्या आयोजकांनी गणेशोत्सवाच्या वेळी आखलेल्या योजनांमध्ये कोरोनामुळे मृत पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबाला मदत करणे आणि लडाखमधील चिनी सैन्याविरोधात नुकत्याच झालेल्या चकमकीत ठार झालेल्या सैनिकांचा सन्मान करणे आहे. याने गणेशोत्सवाऐवजी आपल्या प्रयत्नांना ‘आरोग्य उत्सव’ म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी २५ लाख रुपये देणार असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे म्हणाले, आमचा आदर्श ‘राष्ट्र प्रथम’ आहे. हा सोपा निर्णय नव्हता. पण आम्हाला गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत दररोज सरासरी १ ते १.३० लाख लोक दर्शनाला यायचे. ११ दिवसांत जवळपास दीड कोटी लोक दर्शन घ्यायचे. त्यामुळे सामाजिक अंतराचे पालन करणे कठीण होईल, असेही ते म्हणाले.

मंडळाने यंदा उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना न करता केवळ पूजेची मूर्ती ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ मंडळानं आगमन मिरवणूक सोहळा व पाटपूजन सोहळा रद्द केला आहे. मुंबईसह राज्यातील अन्य अनेक मोठ्या मंडळांनीही असेच निर्णय घेतले आहेत. ‘लालबागच्या राजा’ मंडळानं त्याही पुढं जाऊन उत्सवच साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी राजाच्या मंडपात रक्तदान व प्लाझ्मा दानाची शिबिरं घेतली जातील, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळं ‘लालबागचा राजा’ यंदा भक्तांना अगदी वेगळ्या रूपात दर्शन देणार हे स्पष्ट झालं आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ८७ वे वर्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER