‘लक्ष्मी बॉम्ब’ आता ‘लक्ष्मी’ नावाने प्रदर्शित होणार

Laxmmi Bomb Akshay Kumar

अक्षयकुमारने (Akshay Kumar) जेव्हा ‘लक्ष्मी बॉम्ब’ (Laxmmi Bomb) चित्रपट साईन केला तेव्हापासूनच त्याची चर्चा सुरू झाली होती. दक्षिणेतील कंचना चित्रपटाचे हिंदी रिमेक असलेल्या या चित्रपटात अक्षयकुमार तृतीयपंथीयाची भूमिका करत आहे. चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांची चांगलीच उत्सुकता जागवत होते. ज्याने ‘कंचना’ दिग्दर्शित केला त्याच राघव लॉरेन्सने हिंदी रिमेकचेही दिग्दर्शन केले आहे. प्रेक्षक अक्षयच्या या लक्ष्मी बॉम्बची आतुरतेने वाट पाहात होते. परंतु लॉकडाऊनमुळे चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नव्हता. चित्रपटगृहे बंद असल्याने अक्षयने आपला हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रमोशनही सुरू केले. मात्र चित्रपटाविरोधात मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण झाला आणि अक्षयला प्रथमच त्याच्या चित्रपटाचे नाव बदलावे लागले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता तुषार कपूर प्रथमच निर्माता म्हणून समोर येत आहे.

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्याबरोबर हिंदुत्ववादी संघटनांनी या चित्रपटाच्या नावामुळे देवी लक्ष्मीची बदनामी होत असल्याचे सांगत चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली. चित्रपटाच्या नावामुळे अक्षयकुमार सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला होता. चित्रपटाचा ट्रेलर डिसलाईक करणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने अखेर डिसलाईकचा पर्यायच बंद करून टाकण्यात आला होता. अशीच परिस्थिती राहिली तर चित्रपट फ्लॉप होईल या भीतीने राघव लॉरेंस आणि अक्षयकुमारने चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. मग अक्षयने तृतीयपंथी लक्ष्मीनारायण त्रिपाठीच्या मदतीने चित्रपटाला वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मीनारायण त्रिपाठीने हा चित्रपट तृतीयपंथीयांची गाथा सांगणारा आहे असे सांगून जनतेचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो काही यशस्वी झाला नाही. करणी सेनेने नावाबाबत आक्रमक भूमिका घेत चित्रपटावर बंदीची घोषणा केली. त्यानंतर मात्र अक्षयने नाव बदलाबाबत गंभीरतेने विचार सुरू केला.

त्यानुसार काल सेंसॉर बोर्डच्या सदस्यांसोबत बैठक झाल्यानंतर चित्रपटाच्या नावातून बॉम्ब शब्द काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता हा चित्रपट लक्ष्मी या नावाने प्रदर्शित होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER