‘लेडी अमिताभ’ विजयाशांती अखेर भाजपमध्ये, भाजपची ताकद वाढणार

VijayShanti

नवी दिल्ली : दक्षिणेतील सुपरस्टार राहिलेल्या ऐंशीच्या दशकातील दक्षिणेतील सुपरस्टार आणि ‘लेडी अमिताभ’ आणि माजी खासदार विजयाशांती (Vijayashanti) यांनी अखेर भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाने भाजपचं बळ वाढलं असल्याचं बोललं जात आहे. ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार कामगिरी केल्यानंतर विजयाशांती यांनी घरवापसी केली आहे. या आधी काँग्रेस नेत्या आणि अभिनेत्री खुशबू (Kushboo) यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. एकीकडे सुपरस्टार रजनीकांत यांनी सक्रिय राजकारण करण्याचा निर्णय घेतलेला असतानाच विजयाशांती आणि खुशबू सारख्या एकेकाळच्या दक्षिणेतील सुपरस्टार राहिलेल्या अभिनेत्रींनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपचं बळ वाढलं आहे.

दक्षिणेतील लेडी अमिताभ म्हणून सुपरिचित असलेल्या विजयाशांती यांनी 1997मध्ये भाजपमधूनच राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. मात्र, स्वतंत्र तेलंगनाच्या आंदोलनाने जोर धरल्यानंतर त्या टीआरएस प्रमुख केसीआर यांच्या संपर्कात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी थेट टीआरएसमध्ये प्रवेश केला होता.

काँग्रेसमध्ये प्रवेश

विजयाशांती यांनी 2014मध्ये टीआरएसचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र काँग्रेसमधील वागणुकीवरून त्या समाधानी नव्हत्या. या नाराजीतूनच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. विजयाशांती यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे.

शिक्षण पूर्ण होताच फिल्मी दुनियेत पदार्पण

विजयाशांती यांचा जन्म 24 जून 1966 मध्ये तामिळनाडूतील चेन्नई येथे झाला होता. चेन्नईच्या प्रसिद्ध होली अँजिल्स हायस्कूलमधून त्यांनी शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी लगेचच फिल्म इंडस्ट्रीकडे मोर्चा वळवला. 1980मध्ये कल्लुकुल एरम या तामिळ सिनेमातून त्यांनी फिल्मी करिअरला सुरुवात केली. तामिळ आणि तेलुगू भाषेतील अनेक सिनेमात त्यांनी काम केलं. अवघ्या दोन वर्षातच त्यांनी ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ठसा उमटवला.

… आणि ‘लेडी अमिताभ’ बनली

1990च्या दशकात त्या फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होत्या. त्याकाळात एका सिनेमासाठी त्या एक कोटी रुपये मानधन घ्यायच्या. 1990मध्ये ‘कर्तव्यम’ या तेलुगू सिनेमात त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची जबरदस्त भूमिका केली. या भूमिकेसाठी त्यांनी पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. ही चित्रपट नंतर हिंदीतही डब करण्यात आला होता. त्यानंतर विजयाशांती यांना ‘लेडी अमिताभ’ म्हणून ओळखले जाऊ लागले. तमिळ, तेलुगू आणि हिंदी या तिन्ही भाषेतील अनेक सुपरस्टार्ससोबत त्यांनी काम केलं.

भाजपच्या महिला मोर्चातून राजकारणास प्रारंभ

माजी खासदार असलेल्या विजयाशांती 1998मध्ये भाजपच्या सदस्य झाल्या. त्यांना भाजपच्या महिला मोर्चाच्या महासचिव करण्यात आलं. 1999मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या कुडप्पा लोकसभा मतदारसंघातून लढणार होत्या. त्यामुळे भाजपने सोनिया गांधी यांच्या विरोधात विजयाशांती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, सोनिया गांधी यांनी बेल्लारीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने विजयाशांतींना निवडणुकीचं तिकीट मिळू शकलं नाही. (Veteran actress Vijayashanthi joined BJP)

जयललितांचाही प्रचार केला

1996मध्ये विजयाशांती यांनी अखिल भारतीय अन्ना द्रविड मुनेत्र कळघमला पाठिंबा दिला होता. यावेळी त्यांनी एआयएडीएमकेच्या नेत्या जयललिता यांच्यासाठी प्रचारही केला होता.

नवा पक्ष स्थापन केला, पण…

मीडिया रिपोर्टनुसार त्यांनी जानेवारी 2009मध्ये राजकीय पक्षाची स्तापना केली होती. ‘तल्ली तेलंगना’ नावाने स्थापन केलेल्या या पक्षाला लोकांचा प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी टीआरएसमध्ये हा पक्ष विलिन केला. राजकारणात सक्रिय राहिल्यामुळे या काळात त्या फिल्म इंडस्ट्रीत फारशा सक्रिय नव्हत्या. 2004नंतर तर त्यांनी नव्या फिल्म करणंही बंद केलं. 2006मध्ये नायुडम्मा हा त्यांचा शेवटचा तेलुगू सिनेमा आला होता. (Veteran actress Vijayashanthi joined BJP)

टीआरएसच्या तिकीटावर खासदार

2009मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या मेडक लोकसभा मतदारसंघातून उभ्या राहिल्या आणि टीआरएसच्या तिकीटावर खासदारही झाल्या. दोन वर्षानंतर 2011मध्ये त्यांनी के. चंद्रशेखर राव यांच्यासोबत तेलंगनाच्या आंदोलनात स्वत:ला झोकून दिलं. स्वतंत्र तेलंगनासाठी त्यांनी संसदेतच राजीनामा दिला होता. मात्र तत्कालीन लोकसभा अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा फेटाळून लावला. योग्य प्रक्रियेनुसार राजीनामा न दिल्याने तो फेटाळण्यात आला होता. त्यानंतरही त्या तेलंगनाच्या आंदोलनात सक्रिय राहिल्या.

काँग्रेसमध्ये आल्या आणि पराभूत झाल्या

2014 मध्ये त्यांनी टीआरएसला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी मेदक विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली. पण त्या पराभूत झाल्या. त्यानंतर काही वर्षे त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या. 2018मध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विजयाशांती यांची तेलंगना पीसीसी चुनाव अभियान समितीच्या स्टारप्रचारक म्हणून नियुक्ती केली. पण तरीही त्या राजकारणात म्हणाव्या तशा सक्रिय राहिल्या नाहीत. परंतु, तब्बल 13 वर्षानंतर त्यांनी पुन्हा फिल्मी दुनियेकडे मोर्चा वळवला. 2020मध्ये त्यांचा सारिलेरू नीकेव्वरू (Sarileru Neekevvaru) हा चित्रपट प्रदर्शित झाला. (Veteran actress Vijayashanthi joined BJP)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER