जीभेला चव नसणे – लक्षण एक कारणे अनेक !

Lack of taste in tongue.jpg

स्वच्छ लाल जीभ पाचनसंस्थान चांगले असण्याची निशाणी आहे. चव समजणे रसज्ञान, वाणी हे या इंद्रियाचे मुख्य कार्य. जिव्हेचे कार्य व्यवस्थित होणे, व्यवस्थित रसज्ञान होणे याकरीता जिव्हा निर्लेखन (tongue cleaning), गुळण्या, जेवणानंतर चूळ भरणे हे नित्य दिनचर्येत आवश्यक आहे. जिभेवर छाले, त्यावर पांढरा स्तर निर्माण होणे, अति रक्तवर्णी होणे, वर्ण बदलणे, जीभ कोरडी पडणे हे सर्व शरीरात त्रिदोषांचा असमतोल, व्याधी, पाचन बिघडणे इ. गोष्टींकरीता दर्शन परीक्षाच आहे. तज्ज्ञाकडे गेल्यावर ते जीभेचे परीक्षण नक्कीच करतात.

अन्नाची चव लागत नाहीए किंवा जीभेला चवच नाही ही लक्षणे कोरोना मधे बघायला मिळताहेत. तोंडाला चव नसणे किंवा अन्नाची चव न समजणे यालाच अरसज्ञता, आस्य वैरस्य ( आस्य = मुख, वैरस्य – विरसता ) ही अनेक व्याधीचे लक्षण समजले जाते.

आयुर्वेदात ताप आल्यावर शरीरात उत्पन्न लक्षणे सांगतांना तोंडाला चव नसणे, जेवणाची इच्छा नसणे ही लक्षणे सांगितली आहेत.

पाचन बिघडले असेल तर तोंडाला चव नसते. मुख्यतः पचायला जड आहार, थंड पदार्थ ( थंड स्पर्श असणारे व थंड प्रकृतीचे ) , तळलेले, नेहमीच पोटास तड लागेस्तोवर जेवण यामुळे पाचन संस्थान व्यवस्थित कार्य करू शकत नाही त्यामुळे हळूहळू पाचनविकार उत्पन्न होतात. परिणामस्वरूप अन्नाची इच्छा नसणे, चव न लागणे ही लक्षणे निर्माण होतात.

मानसिक चिंता अति विचार हेसुद्धा अन्नावरची इच्छा कमी करण्याचे कारण आहे. चिंता किंवा एखाद्या विषयावर खूप विचार करीत बसणे हे चव न करणे वा आस्य वैरस्याचे एक कारण सांगितले आहे.

गर्भावस्थेत सुरवातीच्या काही दिवसात तोंडाला चव नाही अशी तक्रार बऱ्याच स्त्रियांमधे आढळून येते.प्लीहारोग, यकृतविकार, प्लीहावृद्धी (spleenomegaly) , यक्ष्मा पाण्डु अशा कष्टदायक रोगांमधेसुद्धा तोंडाला चव नसते.

बऱ्याचवेळा काही औषधी घेतल्यानंतर जीभेची चव कमी होते. प्रदीर्घ आजार व औषध सेवन यामुळे तोंडाला चव नसणे अनेकवेळा अनुभवायला येते.

कारण अनेक आहेत. शरीरात कोणत्याही अवयवात बिघाड झाला उदा. शिरःशूल असो वा सांधेदुखी, पोटाचे विकार असो वा फुफ्फुसाचे किडनीचे तंत्र बिघडले वा यकृताचे; अरुचि, चव नसणे, खाण्याची इच्छा नसणे या लक्षणांचा समावेश होतोच.

त्या त्या रोगाची चिकित्सा केली की या तक्रारी कमी होतात. चव नसणे, रसज्ञान न होणे यावर सर्वात मुख्य व पहिली उपाय योजना म्हणजे लंघन ! ताकद चांगली असेल तर फक्त गरम पाणीच पित राहावे, शक्ती नसेल अशक्त व्यक्ती असेल तर मूगाचे कढण, सूप असा आहार घेणे. सुंठ आलं हिंग अशा पाचक मसाल्यांचा वापर करणे. त्याचप्रमाणे कडाडून भूक लागू देणे. जाड पांघरूण घेऊन घाम येऊ देणे व वाढलेल्या दोषांचे पाचन होऊ देणे. शरीराला विश्रांती देणे. शरीराला वेळ देणे आवश्यक. जीभेला चव रस ज्ञान होत नाही हे लक्षात आल्याबरोबर आहारात बदल व तज्ज्ञाचा सल्ला आवश्यक ठरतो. अरसज्ञता, आस्यवैरस्य हा छोटासा बदल आहे पण वेळीच उपाययोजना हा स्वास्थ्यरक्षणाचा मूलमंत्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER