अ‍ॅटर्नी जनरलनी संमती दिल्यानंतर कुणाल कामरा आणखी आक्रमक

सुप्रीम कोर्ट व वेणुगोपाळ यांच्यावर जहरी टीका

Kunal Kamra - K. K. Venugopal

नवी दिल्ली :- सर्वोच्च न्यायालयाविषयी केलेल्या टष्ट्वीटबद्दल न्यायालयीन अवमाननेची (Contempt of Court) कारवाई करण्याची संमती अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी दिल्यानंतर ‘स्टँड-अप कॉमेडियन’ (Stand-Up Comedian) कुणाल कामरा याने नमते घेऊन दिलगिरी प्रदर्शित करण्याऐवजी उलट आणखी आक्रमक पवित्रा घेत सर्वोच्च न्यायालय व वेणुगोपाळ यांच्यावर आधीपेक्षा अधिक जहरी टीका केली.

श्रीरंग कटनेश्वरकर व अभिषेक रासकर हे सर्वोच्च न्यायालयातील दोन वकील व स्कंध वाजपेयी या कायद्याच्या विद्यार्थ्यासह एकूण १० जणांनी कामरा यांच्याविरुद्ध ‘कन्टेम्प्ट’ याचिका दाखल करण्यासाठी अ‍ॅटर्नी जनरलकडे संमती मागितली होती. त्यापैकी आठजणांना वेणुगोपाळ यांनी संमती देऊन तशी पत्रे पाठविली. याची बातमी शुक्रवारी सकाळी प्रसिद्ध होताच कामरा याने सर्वोच्च न्यायालय व वेणुगोपाळ यांना उद्देशून एक निवेदन काढून ते ट्वीटरवर प्रसिद्ध केले. माझ्या ज्या आधीच्या ट्वीटवरून  ‘कन्टेम्प्ट’ची कारवाई प्रस्तावित केली आहे ती मी बिलकूल मागे घेणार नाही किंवा माफीही मागणार नाही, असे त्याने त्यात म्हटले.

या नव्या ट्वीटमध्ये कामरा लिहितो की, सर्वोच्च न्यायालयाने माझ्याविरुद्ध ‘कन्टेम्प्ट’ची केस जरूर चालवावी. त्यासाठी मी तयार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व देशातील मोठ्यात मोठे वकील अशा ‘व्हीआयपी’ प्रेक्षकांसमोर ‘शो’ सादर करायला मला नक्कीच आवडेल. पण जे माझ्याएवढे भाग्यवान नाहीत व जे आधीपासून रांगेत आहेत त्यांना डावलून माझे प्रकरण ऐकू नका एवढेच मला सांगायचे आहे. सर्वोच्च न्यायालयाचा वेळ बहुमूल्य आहे याची मला कल्पना आहे. म्हणूनच जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणे, सुधारित नागरिकत्व कायदा यासारख्या देशाच्या दृष्टीने अधिक महत्वाची जी प्रकरणे तुम्ही बाजूला ठेवली आहेत ती आधी ऐका एवढेच मला सांगायचे आहे.

कामरा न्यायालयास उद्देशून म्हणतो की, माझ्यावरील ‘कन्टेम्प्ट’साठी तुम्ही सांगाल त्यावेळी मी हजर व्हायला तयार आहे. पण प्रशांत भूषण यांच्याप्रमाणे त्यासाठीही किमान २० तास युक्तिवादासाठी द्यावेत, असे मला वाटते. माझी ट्वीट हा ‘कन्टेम्प्ट’ आहे, असे न्यायालयाने अद्याप तरी म्हटलेले नाही. पण तसा निष्कर्ष काढून मला शिक्षा करण्याआधी न्यायाधीशांनी एकदा थोडेसे हसून घ्यावे!

कामरा पुढे म्हणतो की, सर्वोच्च न्यायालयात महात्मा गांधींचा फोटो काढून तेथे हरीश साळवे यांचा फोटो लावावा, असे मी आधीच्या ट्वीटमध्ये म्हटले होते. त्यापुढे जाऊन आता मला असे म्हणायचे आहे की, न्यायालयात पं. नेहरूंचा फोटो काढून तेथे महेश जेठमलानी यांचा फोटो लावण्यात यावा.

‘रिपब्लिक टीव्ही’चे प्रधान संपादक अर्णव गोस्वामी यांनी अंतरिम जामिनासाठी केलेला अर्ज तातडीने सुनावणीस घेणे व त्यांना जामीन मंजूर केला जाणे यावरून कामरा यांनी आधीची ट्वीट केली होती. त्यापैकी ज्या चार ट्वीटबद्दल त्यांच्यावर ‘कन्टेम्प्ट’च्या कारवाईसाठी संमती मागण्यात आली ती अशी होती:

  • देशाचे सर्वोच्च न्यायालय हे देशातील सर्वोच्च विनोद झाले आहे.
  • ज्या वकिलांना पाठीचा कणा थोडा तरी शिल्लक आहे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख करताना ‘आदरणीय’ हा शब्द वापरणे सोडून द्यावे. कारण या इमारतीतून आदर केव्हाच गायब झाला आहे.
  • रांग मोडून घुसलेल्या ‘फर्स्ट क्लास’ प्रवाशांना न्या. धनंजय चंद्रजूड शॅम्पेन ‘सर्व्ह’ करत आहेत. मात्र रांगेतील इतर सामान्य लोकांना, ‘शॅम्पेन’ तर सोडाच पण आपल्याला आत घेऊन बसायला तरी मिळेल की नाही हेही माहित नाही.
  • ‘अशी’ राष्ट्रीय महत्वाची प्रकरणे आपले सर्वोच्च न्यायालय ज्या त्वरेने हाती घेत आहे ते पाहता तेथे महात्मा गांधींच्या जागी हरीश साळवे यांचा फोटो लावायला हवा, असे वाटते.

कामरा यांचे ट्वीटरवर १७ लाख ‘फॉलोअर्स’ आहेत.

वेणुगोपाळ यांनी वाजपेयी यांना पाठविलेल्या संमती पत्रात पत्रात म्हटले की,अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण सर्वोच्च न्यायालय आणि तेथील न्यायाधीशांची हवी तशी बदनामी करू शकतो, असा समज लोकांनी करून घेतलेला दिसतो. पण संविधानाने दिलेल्या या स्वातंत्र्याला ‘कन्टेम्प्ट’ कायद्याची मर्यादा आाहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयावर विनाकारण व विधिनिषेधशून्य टीका केली तर शिक्षा होऊ शकते, याची जाणीव लोकांना करून देण्याची गरज आहे.

‘या इमारतीने प्रतिष्ठा तर केव्हाच गमावली आहे’ आणि ‘देशाचे सर्वोच्च न्यायालय हा देशातील सर्वोच्च विनोद झाला आहे’ अशी वक्तव्ये कामरा यांनी ट्वीटमध्ये केली होती. तसेच कामरा यांनी एका ट्वीटसह भगव्या रंगातील आणि वर राष्ट्रध्वजाऐवजी सत्ताधारी भाजपाचा झेंडा लावलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीचे छायाचित्रही टाकले होते. यांचा संदर्भ देत अ‍ॅटर्नी जनरल पत्रात म्हणतात, ‘सर्वोच्च न्यायालय व तेथील न्यायाधीश नि:ष्पक्ष नाहीत व ते फक्त भाजपाच्याच तालावर नाचतात’,असा बदनमीकारक रोख या वक्तव्यांतून स्पष्टपणे ध्वनित होतो. ही ट्वीट  विनोद आणि थट्टा यांची मर्यादा ओलांडून नक्कीच ‘कन्टेम्प्ट’च्या हद्दीत प्रवेश करणारी आहेत.

अ‍ॅटर्नी जनरलची संमती मिळाल्याने ती मागणारे आता  कामरा यांच्याविरुद्ध न्यायालयात ‘कन्टेम्प्ट’ची याचिका दाखल करू शकतील.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER