जीएसटी भवन आगीत तिरंगा वाचवणाऱ्या कुणाल जाधव यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार

मंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकारामुळे मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाधव यांचे कौतुक

मुंबई  : माझगाव येथील जीएसटी भवनला दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत जीवाची पर्वा न करता इमारतीवरील राष्ट्रध्वज सुखरूप खाली आणणाऱ्या कुणाल जाधव यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्कार केला. सह्याद्री राज्य अतिथीगृहात आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या या सत्कारास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार आदी मंत्रीही उपस्थित होते.

कुणाल जाधव यांच्या शौर्याची बातमी वाचल्यानंतर मंत्री अशोक चव्हाण यांनी काल ट्विटरवरून कुणाल जाधव यांच्या धाडसाचे कौतुक केले होते. मुंबईत आल्यानंतर त्यांनी श्री. जाधव यांना ‘सह्याद्री’वर बोलावून घेतले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही जाधव यांचा परिचय करून दिला व शाल, श्रीफळ तसेच शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार केला.

दुर्घटना : सन २०१९मध्ये १७९ मुंबईकर जीवाला मुकले

कुणाल जाधव हे जीएसटी भवन येथे शिपाई म्हणून काम करतात. आग लागली त्यावेळी ते तळमजल्यावर होते. आगीमुळे इमारतीवरील राष्ट्रध्वजास झळ पोहोचू शकते, हे ध्यानात आल्यावर ते जीवाची बाजी लावून इमारतीचे 9 मजले पळत चढून गेले. आग तिथे पोहोचेपर्यंत जाधव यांनी सन्मानपूर्वक राष्ट्रध्वज सुखरूपपणे खाली आणला. जाधव यांची राष्ट्रप्रतिका प्रती असलेली भावना खूप स्पृहनीय असल्याने त्यांच्या या धाडसाचे कौतूक होत आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री श्री. ठाकरे आणि मंत्रिमंडळातील सदस्यांनी आज या सत्काराने भरच घातली.