कुवळेकर यांना शिवसैनिकांचे राजीनामे मागण्याचा नैतिक अधिकार नाही- लक्ष्मी शिवलकर

रत्नागिरी/प्रतिनिधी: ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हा प्रकल्पाच्या बाजूने आणि आता प्रकल्प विरोधाची दुटप्पी भूमिका घेणारे शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांना आपला राजीनामा मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. कुवळेकर यांचे सध्याचे संघटनेतील वर्तन आमदार झाल्यासारखेच आहे. एकेकाळी ज्यांनी पक्षसंघटना, पक्षनेतृत्वावार खालच्या पातळीवर जाऊन टीका केली त्यांचे आता मुके घेणाऱ्या कुवळेकरांनी स्वाभिमान गहाण ठेवलाय काय? असा खणखणीत प्रश्न शिवसेनेच्या सागवे विभागातील जिल्हा परिषद सदस्या सौ. लक्ष्मी शिवलकर यांनी उपस्थित केला आहे.

विकास आणि रोजगार निर्मितीच्या मुद्यावर ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करत जि. प. सदस्या सौ.शिवलकर पक्षाच्या विरोधात दंड थोपटून रिफायनरी समर्थनार्थ उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे शिवसेनातालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी सौ. शिवलकर यांनी जि. प. सदस्यत्वपदाचा राजीनामा द्यावा आणि खुशाल रिफायनरीचे समर्थन करावे असे आव्हान दिले होते. त्यावर सौ. शिवलकर यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

यावेळी बोलताना शिवलकर म्हणाल्या की, ज्या वेळी रिफायनरी प्रकल्पाची राजापूरला घोषणा झाली त्यावेळी हेच तालुका प्रमुख आम्हांला शेतकरी वेडे आहेत, उगीच विरोध करतायत, विकास होईल, गप गुमान जमिनी देऊन टाकायच्या असे सांगून प्रकल्पाचे समर्थन करत होते. मात्र आता वारा बदलल्याबरोबर विरोधाच्या भूमिकेत गेले आहेत. त्यांची भूमिका कायमच अशी दुटप्पी राहिली असून त्यांना आपला राजीनामा मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असा टोला सौ. शिवलकर यांनी हाणला आहे. प्रामाणिक आणि निष्ठावान शिवसैनिकांवर कारवाईचा बडगा उगारता आणि ज्यांनी प्रकल्प विरोधी आंदोलनांमध्ये पक्षावर, पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंसह आमदारांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली त्यांचे मुके घेता, याला लाज वाटत नाही? स्वाभिमान गहाण टाकलात काय? अशा जहाल शब्दांत सौ. शिवलकर यांनी पलटवार केला आहे. विधानसभा निवडणूक जवळ आली की कायमच आमदारकीचे डोहाळे लागणाऱ्या कुवळेकरांना जणू आता आपण आमदारच झाल्यासारखं वाटतंय आणि त्याच थाटात जणू त्यांचे वागणे आहे असा उपरोधिक टोलाही सौ. शिवलकर यांनी लगावला आहे. तुमचा बोलविता धनी कोण आहे याचीही आम्हाला पुरती कल्पना आहे, उगीच आणखी तोंड उघडायला लावू नका, तुम्हीच उघडे पडाल असेही सौ. शिवलकर यांनी नमुद केले आहे.