कुळीथ – कफहरण करणारे पथ्यकर धान्य !

Horse Gram - Kulith

काही धान्यप्रकार असे आहेत की ते रोजच्या जेवणात समाविष्ट नसतात. किंवा दुसऱ्या अर्थाने ही धान्य रोज घेऊ पण नये. नित्य सेवनीय आहारात या धान्याचा समावेश पण नाही. परंतु आजारात या पथ्य धान्याचा खूप चांगला उपयोग होतो. त्यापैकी एक धान्यप्रकार आहे कुळीथ! बऱ्याच जणांना कुळीथ म्हणजे काय हे माहित नसेल. पण बऱ्याच घरात याचे पिठलं

ओळखीचे आहे. बघूया आयुर्वेदात वर्णित या कुळीथाचे गुण –

उष्णाः कुलत्थाः पाकेऽम्लाः शुक्राश्मश्वासपीनसान् ।
कासार्शः कफवातांश्च घ्नन्ति पित्तास्रदाः परम् ॥

कुळथ उष्ण अम्लपाकी असणारे धान्य आहे. शुक्राश्मरी, श्वास ( दमा), पीनस ( नाक वाहणे) कास ( खोकला ) अर्श ( मूळव्याध) कफविकार वातविकार यांना नष्ट करणारे आहे. कुळथ उष्ण आणि अम्ल पाकी असल्याने पित्त वाढविणारे तसेच रक्त दुष्टी करणारे आहे. त्यामुळे अम्लपित्त रक्तविकार या व्याधींकरीता कुळीथ हे कुपथ्य सांगितले आहे.

या कुळीथाच्या गुणांवरून लक्षात येईल की याचे गुण आणि व्याधी कार्य हे कफ विकार वातविकारांवर अधिक आहे. कोविड झाल्यास मिळाणाऱ्या लक्षणांमधे ताप, खोकला सर्दी दम लागणे आढळते. या सर्वच स्थितीत कुळीथ हे धान्य योग्य पथ्याहार ठरू शकतो.

कशा पद्धतीने कुळीथाचा आहारात वापर करू शकतो बघूया काही पथ्य रेसिपी –
कुळीथाचे सूप / यूष – कुळीथ भाजून ठेवावे. भाजलेल्या कुळीथाचे मिक्सरवर भरड दळून त्यात १४ पट पाणी घालून शिजवावे. शिजतांना त्यात धणे जीरे पूड सैंधव घालावे. सूप शिजल्यावर त्यावर तूप जीरे हिंगाची फोडणी घालू शकता. असे ते कुळीथाचे कढण कफनाशक ज्वरनाशक, भूक वाढविणारे आहे.

सप्तमुष्टीक यूष – हे सूप करतांना ७ घटक द्रव्य वापरतात म्हणून सप्तमुष्टीक यूष. कुळीथ मूग यव ( जौ) बोरकूट मूळ्याचे तुकडे धणे आलं या द्रव्यांनी युक्त हे यूष उत्तम पाचक ज्वर घसा खवखवणे, जिभेला चिकटपणा असणे, चव नसणे ह्यावर उपयुक्त आहे.

आजारात पातळ, चव आणणारे, अशक्तपणा घालविणारे तसेच चिकित्सा म्हणून उपयोगी ठरणारे पदार्थ हवे असतात. कुळीथ हे धान्य कोविडच्या काळात नक्कीच आहार पर्याय ठरू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button