कुछ तो लोग कहेंगे !

Kuch Toh Log Kahenge

हाय फ्रेंड्स ! आपल्या आयुष्यात अगदी दररोज आपण कुठलीही गोष्ट ,”लोक काय म्हणतील ?” या कडे बघत ,असा प्रश्न स्वतःला विचारतच जगत असतो. त्या भोवतीच आपल्या आयुष्याचा गोफ आपण विणत राहतो असेही म्हणता येईल. आता हेच बघा ना ! गौरव — कल्याणी , दोघांनीही लग्न आपला वैयक्तिक समारंभ आहे ,त्यात लोकांना बोलावण्याची काही एक गरज नाही. नोंदणी पद्धतीने लग्न करायचं असं ठरवलं. पण लवकर अशा गोष्टींना पूर्ण मान्यता मिळणार नव्हती. लोकांना नाही बोलवायचं म्हणजे कसं ?” लोक काय म्हणतील ?” असा प्रश्न दोघांच्याही आयांना पडलेला .शेवटी आग्रहाखातर थोडे महत्त्वाचे विधी आणि दोघांकडे पंचवीस – पंचवीस लोक अशा अटीवर लग्न विधी पार पडले. दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला .काही दिवस आई-वडिलांना लोकांच्या नाराज आणि तीव्र, बोचक प्रतिक्रिया ऐकाव्या लागल्या .नंतर बऱ्याच जणांना तीच पद्धत आवडल्याच्याही प्रतिक्रिया आल्या.मळलेली पायवाट डावलून जायचं म्हटले की हे होणारच !

विनिता च्या मुलाने NEET परीक्षेची पूर्ण तयारी केली. झपाटून अभ्यास केला. पूर्ण स्वतःला अभ्यासात झोकून दिलं. रिझल्ट लागला , तो उत्तीर्ण झाला ,स्कोअरही छान आला. त्याला मेडिकलला ऍडमिशन मिळाली. पण….. पण त्याने एका चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन बीएससी करण्याचे ठरवले. त्याला एमपीएससी करायचे आहे. अर्थात NEET दिली तीही मनापासूनच .कोणी जबरदस्ती केली नव्हती .तोही त्याचाच निर्णय होता. त्याने एकदम निर्णय बदलला. कुठेतरी आई-वडिलांना वाटलंच असणार,” लोक काय म्हणतील ?”

घर म्हटलं की भांड्याला भांड लागतच. आवाजही होतातच. हे घरोघरी होत असले तरी प्रत्येकाला काळजी असते की या वादविवादाचा आवाज दाराच्या बाहेर जाऊ नये याची. कारण यामागे भीती असते की ,”लोक काय म्हणतील ?”

सिद्धार्थ आणि नंदिता . ऑफिसमध्ये मैत्री झाली मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले लग्न करण्याचे ठरविले. पण घरच्या लोकांचा कडाडून विरोध कारण दोघांच्या जातीं भिन्न ! या दबावाला बळी पडून दोघांनी आत्महत्या केली. त्याबरोबर चिठ्ठी सापडली त्यात लिहिले होते की ,”लोक काय म्हणतील ?”या भीतीपोटी त्यांनी जीवन संपवले होते.

हे लोक म्हणजे कोण असतात? की ज्यांचा परिणाम म्हणून लोक आपले जीवनच संपवतात. काहींना चेहरे लपवावे लागतात ,काहींना कटू शब्द ऐकावे लागतात. हे लोक म्हणजे सगळेच आपल्या आजूबाजूचे. आपला मित्रपरिवार ,ऑफिसमधील सहकारी ,नातेवाईक ,शेजारीपाजारी कॉलनीतले लोक ,ओळखीपाळखीचे म्हणजे सगळेच ! म्हणजे पूर्ण समाजच ! समाजाच्या काही नॉर्म स् ,काही नीतिनियम हे खरोखरी चांगले असतात .आणि त्या पाळायला हव्यात. पाळायचे असतात. परंतु ज्या गोष्टी पूर्णपणे वैयक्तिक आहेत ,त्यात इतरांनी काय म्हणावं, त्याला किती महत्त्व द्यायचं ? जास्तीत जास्त लोक हे टीका-टिप्पणी करायलाच टपलेले असतात. निंदकाचे घर म्हणतात त्याप्रमाणे त्याचा योग्य उपयोग आपण करून घ्यावाही .पण प्रोत्साहन देणारे कमीच असतात. समोरच्याच्या प्रगतीत खरोखरीच आनंद मानणारे लोक तर अगदीच कमी म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्याएवढे. मग फिकीर कशाची करायची लोकांच्या म्हणण्याची? उलट अडथळे कसे निर्माण होतील, मध्ये टांग कशी टाकली जाईल,पाय कसे खेचता येतील यासाठी जास्तीत जास्त उत्साही मंडळी कार्यरत असते. अर्थात सगळेच लोक असेच असतील असही नाही .

पण खरोखरीच यश मिळवायचं असेल तर आपला आपण स्वतंत्र मार्ग आखायला पाहिजे. यशस्वी व्हायला पाहिजे. मग लोक काय म्हणतील याचा विचार कशाला ? अहो नाव ठेवणं, वाटा अडविण हे लोकांचं कामच आहे . आपली यशस्वी पायवाट आपणच ठरवायची निवडायची व चालायला लागायचं !

तेव्हा फ्रेंडस ! कुछ तो लोग कहेंगे , का काम है कहेना ! चालायला लागा, आपल्या प्रगतीच्या वाटेवर, स्वतंत्रपणे !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER