कृणाल पांड्याने शिविगाळ केली, धमकावले- दीपक हुडाची लेखी तक्रार

Krunal Pandya Abused me- Deepak hooda

आॕस्ट्रेलियातील सिडनीत भारतीय क्रिकेटपटूंना वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागत आहे. सलग दुसऱ्या दिवशी हे प्रकार घडल्यावर काही उपद्रवी प्रेक्षकांना मैदानाबाहेरही घालवण्यात आले आहे. भारताने तक्रारही नोंदवलेली आहे पण इकडे आपल्या देशात तर आपलेच खेळाडू आपल्या सहकाऱ्यांना शिविगाळ करत असल्याचे व अपमानास्पद वागणूक देत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात बडोदा (Baroda) संघातील खेळाडू दीपक हुडा (Deepak Hooda). याने कर्णधार कृणाल पांड्यावर (Krunal Pandya). केलेले आरोप अतिशय धक्कादायक आहेत. सैयद मुश्ताक अली स्पर्धेसाठी सरावादरम्यान कृणालने आपल्याला सर्वांसमोर शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक दिल्याचा धक्कादायक आरोप हुडाने केला आहे.

हा आरोप त्याने तोंडीच केलेला नाही तर बडोदा क्रिकेट संंघटनेला पत्र लिहून लेखी तक्रारसुध्दा केली आहे. यामुळे दीपक हुडाने आजपासून सुरु झालेल्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 स्पर्धेतही आपल्याला खेळणे शक्य नसल्याचे संघटनेला कळविले आहे. हुडा याने बडोद्यासाठी 46 प्रथम श्रेणी व 123 टी-20 सामने खेळले आहेत.

हुडाने लिहिलेल्या पत्रानुसार शनिवारी रिलायन्स स्टेडियम येथे सरावादरम्यान हा प्रकार घडला. पत्रात हुडाने लिहिलेय की, मी गेल्या 11 वर्षांपासून बडोद्यासाठी खेळतोय. माझी सैयद मुश्ताक अली स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पण मी निराश आणि दडपणात आहे. माझा खेळायचा सर्व उत्साह मावळला आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्याबद्दल कर्णधार कृणाल पांड्या शिवराळ भाषा वापरत आहे. संघातील इतर सहकारी व रिलायन्स स्टेडीयमवर सरावासाठी आलेल्या इतर संघांच्या खेळाडूंसमोर मला शिवीगाळ केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार सरावादरम्यान हुडा व कृणाल यांच्यात शाब्दीक वाद झाला होता. त्यात कृणालने हुडाला शिविगाळ केल्याचे व धमकावल्याचे समजते.

मुख्य प्रशिक्षक श्री. प्रभाकर यांच्या परवानगीने मी आज (शनिवारी) नेटसमध्ये सराव करत होतो आणि उद्याच्या सामन्यासाठी तयारी करत होतो. त्यावेळी कृणाल तेथे आला आणि माझ्याशी वाईट पध्दतीने बोलू लागला. मी त्याला आपण मुख्य प्रशिक्षकांच्या संमतीने उद्याच्या सामन्यासाठी तयारी करत असल्याचे सांगितले. तर कृणाल मला म्हणाला की, मी कप्तान आहे, मुख्य प्रशिक्षक कोण आहे सांगणारा? मी बडोदा टीमचा सर्वेसर्वा आहे आणि असे म्हणत त्याने दादागिरी करुन मला सरावापासून रोखले, असा आरोप हुडाने आपल्या पत्रात केला आहे. त्याने पुढे,म्हटलेय की, कृणालने नेहमीच मला खाली खेचण्याचा प्रयत्न केला आहे. तू बडोद्यासाठी कसा खेळतो तेच मी बघतो असेही धमकावले. माझ्या कारकिर्दीत असे घाणेरडे वातावरण मी कधीही पाहिले नाही. मी आतापर्यंत केवळ बडोदा क्रिकेटसाठीच खेळत आलोय. गेल्या 7 वर्षापासून आयपीएल खेळतोय आणि माझी कामगिरी सर्वत्र चांगली आहे. मी दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व कप्तानांसोबत खेळलोय. पण कोणत्याही कप्तानाकडून मला अशी खराब वागणूक मिळाली नाही. मी नेहमीच संघासाठी खेळणारा व संघाहिताला प्राधान्य देणारा माणूस आहे. पण अशा परिस्थितीत मी बडोदा संघासाठी खेळू शकत नाही आणि खेळलो तरी आपली सर्वोत्तम कामगिरी मी करु शकणार नाहीअसे हुडाने पत्रात नमूद केले आहे.

आयापीएलमध्ये गेल्या मोसमात तो किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघात होता.

या आरोपांसंदर्भात अद्याप कृणालकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही पण बडोदा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजित लेले यांनी याबाबत व्यवस्थापकाकडून अहवाल मागविला असल्याचे म्हटले असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच काय कारवाई करायची हे ठरवता येईल असे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER