‘कृष्णकुंज’ बनतेय न्यायाचे मंदिर! ग्रंथालये लवकरच सुरू होणार

Raj Thackeray

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे निवासस्थान ‘कृष्णकुंज’ म्हणजे सर्वसामान्यांपासून अनेकांसाठी आशेचे किरण, न्यायाचे मंदिर बनत असल्याचे दिसत आहे. लॉकडाऊनमुळे (Lockdown) अडचणीत आलेले अनेक जण आपल्या अडचणी सांगण्यासाठी, मागण्यांची पूर्तता करण्यासाठी राज ठाकरेंच्या कृष्णकुंज दरबारी पोहचत आहेत.

राज्यातील ग्रंथालय प्रतिनिधींनी आज (८ ऑक्टोबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी ग्रंथालय पुन्हा सुरू करा, अशी मागणी राज ठाकरेंकडे केली. त्यानंतर राज ठाकरेंनी तत्काळ उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना फोन करत ग्रंथालय चालकांच्या समस्या मांडल्या. त्यानंतर उदय सामंत यांनी याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राज ठाकरेंना दिले. (Raj Thackeray Call Uday Samant Regarding Library Reopen) राज्यातील ग्रंथालयांची कवाडे खुली करा, या मागणीसाठी ग्रंथालयांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरेंची कृष्णकुंजवर भेट घेतली.

पुस्तकं ही सकारात्मक ऊर्जा आणि वैचारिक आनंद देतात. कोरोनाच्या नैराश्यपूर्ण वातावरणात त्याची फार आवश्यकता आहे. म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये बंद केलेली ग्रंथालये पुन्हा सुरू करण्यात यावीत. त्यामुळे वाचन चळवळ वृद्धिंगत होईल. त्यावर अवलंबून असलेल्या अर्थचक्रालाही गती मिळेल, असे मत ग्रथांलय प्रतिनिधींनी राज ठाकरेंसमोर मांडलं होतं.

यावेळी राज ठाकरेंनी तात्काळ उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना फोन केला. त्यांच्यासमोर ग्रंथालय चालकांच्या समस्या मांडल्या. तसेच राज्यातील ग्रंथालयं सुरू करण्यास परवानगी देण्याची विनंती केली. त्यानतंर उदय सामंत यांनी राज ठाकरेंच्या विनंतीला मान देत, शक्य तितक्या लवकर ग्रंथालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, लॉकडाऊन सुरू असताना अनेक व्यावसायिकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या मागण्या राजदरबारी मांडल्या. आतापर्यंत डॉक्टर, कोळी महिला, जिम मालक-चालक, हॉटेल व्यावसायिक, मुंबईचे डबेवाले यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER