क्रांतीचौक पोलिस ठाण्यात महिला कर्मचारी पॉझिटिव्ह सायबर पोलिस ठाण्याचे २० जण निगेटिव्ह

Krantichowk police station female staff positive Cyber police station 20 negative

औरंगाबाद : महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथकातील वृध्द पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचा अहवाल १९ मे रोजी प्राप्त झाला होता. आता त्याचठिकाणी राहणा-या व क्रांतीचौक पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या ३८ वर्षीय महिला पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारी समोर आली आहे. यामुळे पोलिस आयुक्तालयाच्या बी विंगमधील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आज पाहायला मिळाले. तर दुसरीकडे सायबर पोलिस ठाण्यातील २० पोलिस कर्मचा-यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. त्यांना २८ मेपर्यंत होमक्वारंटाईन राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकातील वृध्द पोलिस कर्मचा-याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यामुळे त्यांचे कुटुंब क्वारंटाईन करण्यात आले होते. यावेळी सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या त्यांच्या मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या मुलाचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला होता. याशिवाय गुरुवारी सायबर पोलिस ठाण्यातील दोन अधिकारी व १८ पोलिस कर्मचा-यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांचा आज निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाला. त्यांना महापालिकेचे डॉक्टर तन्वीर सिद्दीकी यांनी २८ मेपर्यंत होमक्वारंटाईन राहण्याचे सांगितले आहे.

दरम्यान, पोलिस आयुक्तालयातील त्याचठिकाणी राहणा-या ३८ वर्षीय महिला पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला. या महिला पोलिस कर्मचारी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्यावर औरंगपुरा भागातील महात्मा फुले चौकात बंदोबस्ताची जबाबदारी होती. तसेच क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इतर ठिकाणी देखील त्यांनी बंदोबस्त पार पाडला. या बंदोबस्तादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महिला पोलिस कोरोनाबाधित झाल्याची माहिती मिळताच आज सकाळी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात जंतूनाशक फवारणी व साफसफाई करण्यात आली. या महिलेच्या कुटुंबियांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले असून, त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त मीना मकवाना यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

 

MT LIKE OUR PAGE FOOTER