क्रांती पुन्हा पडद्यामागे

Kranti Redkar

मराठी सिनेमाच्या आजवरच्या प्रवासाकडे वळून पाहिले तर जशा सोज्वळ अभिनेत्रींची परंपरा आहे तशी बिनधास्त नायिका हीदेखील मराठी सिनेमाची एक ओळख आहे. ग्रामीण सिनेमा तर अशा ठसकेबाज अभिनेत्रींनी गाजवला आहेच पण मराठी सिनेमाने शहरातील कथांचा चेहरा घेतला तेव्हाही अशा बोल्ड अभिनेत्रींनी सिनेमाला आजच्या जगात आणायला मदत केली. अशा बिनधास्त व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रींपैकी क्रांती रेडकर. दोन दशकांपूर्वी पडद्यावर आलेली ही अभिनेत्री लग्नानंतर या क्षेत्रापासून काहीशी लांब गेली. त्यात जुळ्या मुली झाल्याने आईपण निभावण्यासाठी क्रांतीने मोठा ब्रेक घेतला. कॅमेरयासमोर नसली तरी काकण या सिनेमाच्या दिग्दर्शनाच्या निमित्ताने क्रांती पडद्यामागे सक्रिय होती. आता पुन्हा ती कॅमेऱ्यामागच्या दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसणार आहे. तिच्या दिग्दर्शनातून तयार होणाऱ्या सिनेमाच नाव अजून गुलदस्त्यात असलं तरी क्रांतीच्या नव्या सिनेमाच्या तयारीला वेग आला आहे.

चांगली अभिनेत्री, उत्तम डान्सर म्हणून मराठी सिनेमा इंडस्ट्रीत आलेल्या क्रांतीने या क्षेत्रात स्थान निर्माण केले. अभिनेत्री म्हणून यशाची चव चाखत असतानाच क्रांतीने पोलिसखात्यात उच्चअधिकारी असलेल्या समीर वानखेडे यांच्यासोबत लग्न केलं आणि तिचे पडद्यावरचे दर्शन कमी झाले. अभिनयापासून ती लांब असली तरी वेगवेगळ्या डान्स रिअ‍ॅलिटी शो, कॉमेडी शोसाठी परीक्षक, निवेदक म्हणून क्रांतीने तिच्या आवडीच्या क्षेत्राशी संपर्क ठेवला होताच. शिवाय इन्स्टापेजवर क्रांतीच्या मेकअप टिप्सच्या व्हिडिओजचे चाहतेही वाढत होते. क्रांतीला विनोदाचेही उत्तम टायमिंग आहे. शब्दांशी खेळत कोपरखळ्या मारण्याची तिची हातोटी आहे. आई आणि मी या संकल्पनेवर असलेले तिचे इन्स्टा रिल्स कमाल आहेत. आता अभिनेत्रीपलीकडे दिग्दर्शकाच्या भूमिकेतून काकण हा सिनेमा केल्यानंतर तिला पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळायचे होते, म्हणूनच तिने तिच्या नव्या सिनेमाची घोषणा केली.

क्रांती सांगते, गेल्या पाच वर्षापासून माझ्या मनात एक गोष्ट घोळत होती. काकण सिनेमाच्या गोष्टीसारखीच ही गोष्टही सिनेमातून मांडावी असं वाटत होतं. तरूणपणात एकमेकांपासून वेगळं झालेलं प्रेमीयुगुल वयाची पन्नाशी उलटल्यावर भेटतं आणि त्यानंतर एकेक आठवणी उलगडतात. तोपर्यंत तो तिच्या एका बांगडीसोबत आयुष्य जगतो ही कंकणची वन लाइन स्टोरी. भावनिक उलथापालथ करणारा हा सिनेमा सादर करताना खूप अनुभव आले. आता हा दुसरा सिनेमापण असाच भावनिक आहे. मला इमोशन्समधून आकाराला येणारी कथा प्रेक्षक म्हणून बघायला, अभिनेत्री म्हणून काम करायला आणि दिग्दर्शक म्हणून बनवायला आवडते. अशा गोष्टी पाहणाऱ्या प्रत्येकाला आपल्या वाटतात. प्रेक्षक अशा गोष्टींमध्ये त्यांचे प्रतिबिंब पाहत असतात. पाच वर्षापूर्वी मला या गोष्टीचा एक धागा सापडला आणि तेव्हाच मी ठरवलं की या कथेवर सिनेमा बनवायचा. क्रांतीच्या या नव्या सिनेमाकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

क्रांतीने आजपर्यंत अनेक मराठी सिनेमांसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. अक्षय बर्दापूरकर यांच्या संकल्पनेवर आधारीत प्लॅनेट टी या उपक्रमातही क्रांतीचा सहभाग होता. कोंबडी पळाली तंगडी धरून या गाण्यावर प्रत्येकाला ठेका धरायला लावणारी, नो एन्ट्री, पुढे धोका आहे या सिनेमात विनोदाचे पंच मारून हसता हसता पुरेवाट करणारी क्रांती ऑन डय़ुटी 24 तास या सिनेमात तितकीच जबाबदार पोलिस हे पात्र निभावणारी, शहाणपण देगा देवा यामधून एक संवेदनशील विषय मांडणारी क्रांती तिचा दुसरा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. क्रांतीच्या नजरेतून उलगडणारी ही कथा लवकरच स्क्रीनवर झळकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER