कोरेगाव-भीमा प्रकरण : शरद पवारांची साक्ष घेण्याच्या मागणीने चौकशीला वेगळ्या वळण मिळण्याची शक्यता

मुंबई :- कोरेगाव भीमा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तात्काळ साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी केली आहे. त्यांनी चौकशी आयोगाकडे तसा अर्जदेखील केला असल्याने कोरेगाव भीमा प्रकरणाच्या चौकशीला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. यावर आयोग काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मराठवाड्यात पाणी साठवणूक, समन्यायी पाणी वाटप आवश्यक : राजेश टोपे

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाचा आणि त्यात पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केल्यानंतर एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले होते. या प्रकरणाच्या चौकशीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठक घेतली होती. पण, त्यानंतर काही तासातच हे प्रकरण केंद्र सरकारने ‘एनआयए’कडे सोपवले. त्यावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यानंतरही याप्रकरणावर वारंवार भाष्य केले आहे. दोन दिवसापूर्वीच पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर अ‍ॅड. प्रदीप गावडे त्यांची साक्ष घेण्याची मागणी केली आहे.

शरद पवार यांनी पत्रपरिषदेत कोरेगाव भीमा दंगलीत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांची नावे घेतली होती. “कोरेगाव भीमा हा वेगळा कार्यक्रम आहे. अनेक वर्षे एका ठिकाणी लोक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमतात. या स्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही भेट दिलेली आहे. त्या काळात जे युद्द झाले. त्यावेळी पेशव्यांचा पराभव झाला होता. ब्रिटिशांच्या बाजुने काही भारतीयही होते हे यावरुन स्पष्ट होते. इथले स्थानिक ग्रामस्थ इथे येणार्‍या हजारो लोकांना पाण्याची व्यवस्था करतात. स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्यांमध्ये कोणतीही कटुता नव्हती. मात्र, आजुबाजूच्या खेड्यात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनी फिरुन वेगळे वातावरण निर्माण केले,” असे पवार म्हणाले होते. त्यावरून पवारांना या दंगलीबद्दलची ही माहिती कोठून मिळाली. त्यांच्याकडे आणखी काय माहिती आहे? याबद्दल त्यांची तातडीने साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी केली आहे.