गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना कोकण प्रवेशावर बंदी नाही- विनायक राऊत

Vinayak Raut

सिंधुदुर्ग : यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना कोकणात प्रवेश दिला जाणार का, असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही बंदी नाही, असे स्पष्टीकरण विनायक राऊत यांनी दिले आहे. कोकणातील गणेशोत्सव आणि मुंबईतला चाकरमानी याचं एक वेगळं नातं आहे. मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणातील आपल्या मूळगावी जातो.

मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. त्यात अधिकाऱ्यांच्या सूचनांची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली. याबाबत दखल घेत विनायक राऊत यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. चाकरमानी आणि गणेशोत्सव हे एक समीकरण आहे.

कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारची बंदी नाही. तसेच जिल्हा प्रशासनाचे वृत्त हा अंतिम निर्णय नसल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली. मात्र कोकणात ज्या ठिकाणाहून चाकरमानी येणार आहेत, त्याच ठिकाणी त्यांची कोविड चाचणी माफक दरात करावी, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER