कोकण पर्यटनाला चालना देण्यासाठी नागपुरात कोकण परिषद

Kokan Parishad

रत्नागिरी(प्रतिनिधी) :  कोकणातील पर्यटन उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने टी. ए. एम. टी. या संस्थेच्या मदतीने नागपूर येथे ७ व ८ डिसेंबर रोजी कोकण पर्यटन परिषद आयोजित केली आहे. या परिषदेमध्ये नागपूर येथील पर्यटन व्यावसायिकांना कोकणातील विविध पर्यटन स्थळांची माहिती देण्यात येणार आहे.

कोकणचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी येथील पर्यटन स्थळांकडे पर्यटक आकर्षित होणे गरजेचे आहे. पर्यटन विकासातूनच रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. यासाठी पर्यटन मंत्रालयाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी नागपुरात कोकण पर्यटन परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत कोकणातील पर्यटन स्थळांविषयी माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोकणातील विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट, वाहन सेवा, टूर ऑपरेटर, निवास न्याहरी, महाभ्रमण, जलक्रिडा, स्कुबा डायविंग व साहसी क्रीडा यांची माहिती दिली जाईल. या कार्यशाळेमुळे कोकणातील व्यावसायाला व इतर खाजगी उद्योजकांना लाभ व कोकणात जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित करणे शक्य होईल .

राज्यातील कोकण विभाग हा पर्यटनासाठी विविध निसर्गसौंदर्य व वैविध्यतेने समृध्द आहे. विविध समुद्रकिनारे, जलदुर्ग, इतिहासकालीन गड, किल्ले, मंदिर वास्तू आहेत. त्याचबरोबर कातळशिल्पे व निसर्गसौंदर्याने कोकण समृध्द आहे. कोकणातील मेवा व तसेच उकडीचे मोदक, सोलकढी, कोंबडी वडे आदी खाद्यपदार्थ देखील पर्यटकांना कोकणाकडे आकर्षित करतात. त्यामुळे या परिषदेत याविषयी माहिती देण्यात येणार आहे.

कोकणातील द्योजकांना या कार्यशाळेत सहभाग घ्यावयाचा असल्यास उदय कदम (९९८७४४५५११) यांच्याशी संपर्क साधा असे पर्यटन विकास महामंडळाचे मुंबईचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक संजय ढेकणे यांनी कळविले आहे.