कोल्हापूरचा नाद खुळा, निवडणुकीआधीच गुलाल उधळला

Kolhapur

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या आणि आपल्या भागात अपेक्षित आरक्षण मिळालेल्या काही इच्छुकांनी आजच गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला. केशवराव भोसले नाट्यगृहात प्रभाग आरक्षण सोडत पार पडली. महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या आणि आपल्या भागात अपेक्षित आरक्षण मिळालेल्या काही इच्छुकांनी यानंतर गुलालाची उधळण केली. तर काहींनी फटक्यांची जोरदार आतषबाजी केली. निवडणुकीआधी इच्छुकांनी केलेल्या या विजय उत्सवाची चर्चा शहरात रंगली. लॉटरी पद्धतीने पार पडलेल्या या आरक्षणात अनेक दिग्गजांच्या प्रभागातील आरक्षण बदलले. अनेक दिग्गजांना आता शेजारील प्रभागाचा आधार घ्यावा लागणार आहे.

आरक्षणाच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीत उमेदवारी करु इच्छिणाऱ्यांचे सर्वाधिक लक्ष लागून राहिलेला प्रभाग आरक्षण सोडतीचा टप्पा आज पार पडला. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी 11 प्रभाग आरक्षित करण्यात आले. 6 प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. अनुसूचित जमातीसाठी कोणताही प्रभाग आरक्षित करण्यात आलेला नाही. तो निरंक ठेवण्यात आलेला आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 22 प्रभाग आरक्षित करण्यात आले आहे. त्यामध्ये नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी 11 प्रभाग आरक्षित करण्यात आले. सर्वसाधारण 48 वर्गातील पुरुषांसाठीसाठी 24 प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. त्याच पद्धतीने सर्वसाधारण महिला खुल्या वर्गासाठी 24 प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत.

कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर पडली असली तरी गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून इच्छुकांनी आपली तयारी सुरू केली आहे. सोडतीनंतर या इच्छुकांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ असे वातावरण पाहायला मिळाले. विशेषतः अपेक्षित आरक्षण जाहीर होताच इच्छुकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. उत्साहाच्या भरात त्यांनी गुलालाची उधळण करत आनंदही व्यक्त केला. महानगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच असे उत्साहाच वातावरण असेल, तर निवडणूक रंगात आल्यानंतर हे राजकीय वातावरण आणखी तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER