कोल्हापूरच्या रिया पाटील हीची पदकांची लयलूट

Ria Patil

कोल्हापूर : गुंटूर (आंध— प्रदेश) येथे झालेल्या 35 व्या राष्ट्रीय ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कसबा बावडा येथील रिया नितीन पाटील हिने दोन सुवर्ण व एक रौप्यपदक पटकावले.

स्प्रिंट 1000 मिड-ले या प्रकारात झालेल्या अटीतटीच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या रियाने केरळच्या स्पर्धकाला मागे टाकत सुवर्णपदक मिळवले. 16 वर्षांखालील मुलींच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत रियाने 25.02 सेकंद वेळ नोंदवून पहिला क्रमांक पटकावला. तिने पश्चिम बंगालच्या सौमिता पॉल (25.33 से.) आणि तमिळनाडूच्या शरॉन मारियाला (25.44 से.) मागे टाकले. महाराष्ट्राची दुसरी धावपटू सानिया सावंत पाचव्या स्थानावर राहिली.

रियाचे हे या स्पर्धेतीले तिसरे पदक ठरले.सोळा वर्षाखालील 400 मीटरमध्ये रियाने रौप्यपदक पटकावले तर रिलेतील सुवर्ण पदक पटकावले. रिया पाटील ही ताराराणी हायस्कूलची विद्यार्थिनी असून ती दहावीमध्ये शिकत आहे.

कोल्हापूरच्या डब्लूआरएसएफ क्लबमध्ये ती सराव करते. प्रशिक्षक अभिजित मस्कर, अश्लेष मस्कर, फराकटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

रिया ही माळ गल्ली, कसबा बावडा येथे राहते. तिचे आई-वडील खासगी नोकरी करतात. शालेय जीवनात राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तिने गुंटूर येथे अजिंक्यपद मिळवल्यानंतर कसबा बावडा येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.